चक्रीवादळामुळे घरांची नासधूस

0
6

गोरेगाव/गोंदिया,दि. १८ : गेल्या पंधरा दिवसांपासून अवकाळी पाऊस आणि गारपिटीने थैमान मांडले. गुरुवारी( १७) सायंकाळच्या सुमारास आलेले चक्रीवादळ, पाऊस आणि गारपिटीने अनेक घरांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. विजेचे खांब आणि झाडे उन्मळून पडले. त्याचबरोबर हलबीटोला येथील दोन म्हशींचा मूत्यू झाला.
गुरुवारी दिवसभर वातावरणात उघाड असताना सायंकाळी साडेसात वाजताच्या सुमारास वारा सुटला. या सुसाट्याच्या वाèयामुळे हलबीटोला येथील २३ घरांवरील टिनाचे पत्रे उडाले. घरांवरील कौलारू देखील उडाले. त्याचबरोबर गारपीटीसह पाऊस आल्याने शेतकरी, शेतमजूर यांना त्याचा फटका बसला. भात पीक, बागायतीपिके आणि भाजीपाला पिकांचे नुकसान झाले. दोन म्हशी मृत्युमुखी पडल्याची माहिती तहसीलदार कल्याणकुमार डहाट यांनी दिली.
सटवा येथे चक्रीवादळाने योगराज पटले यांच्या घरासमोरील आंब्याचे झाड विद्युत खांबावर उन्मळून पडले. त्यामळे विद्युत खांब तुटल्याने परिसरातील वीजपुरवठा खंडीत झाला. यावेळी ग्यानिराम कुंभरे व माणिकचंद नेवारे यांच्या घराजवळील विद्युत खांब तुटून पडल्याने थोड्यावेळेसाठी वाहतूक विस्कळीत झाली होती. आंब्याचे झाड योगराज पटले यांच्या अंगणात पडल्याने डी.जे. व साऊंड सिस्टमची मोडतोड झाली. चक्रीवादळामुळे माणिकचंद सोनवाने यांच्या घरावरील सिमेंटपत्रे तसेच केवलचंद रहांगडाले यांच्या घरावरील टिनाचे पत्रे उडून गेल्याने नुकसान झाले आहे. त्याचप्रमाणे घराची छपरे उडून आर्थिक नुकसान झाले. यासंबंधी लगेच सरपंच रमेश ठाकूर, उपसरपंच उमराव कडुकार, पोलिस पाटील टिकाराम रहांगडाले, तंटामुक्त समिती अध्यक्ष रमेश रहांगडाले यांच्यासह इतर गावातील नागरिकांनी धाव घेत परिस्थितीची माहिती घेतली. सुदैवाने यावेळी कोणताही अनर्थ घडला नाही. चक्रीवादळग्रस्तांना त्वरीत शासकीय मदत देण्याची मागणी सरपंच रमेश ठाकूर यांनी केली आहे.