गावाच्या विकासासाठी मानसिकता महत्वाची- पोपटराव पवार

0
214

आमचा गाव आमचा विकास कार्यशाळा
गोंदिया,दि.२० : ग्रामीण विकासाच्या योजनांचा लाभ गावपातळीवर देण्यासाठी शासन आणि यंत्रणांनी कितीही नियोजन केले तरी ग्रामपंचायतच्या माध्यमातून संबंधित लाभार्थ्यांना योजनांचा लाभ देण्यासाठी आणि गावाचा विकास करण्यासाठी लोकप्रतिनिधी आणि गावपातळीवर काम करणाऱ्या यंत्रणेच्या कर्मचाऱ्यांची गावाच्या विकासाप्रती चांगली मानसिकता असणे महत्वाचे आहे. असे प्रतिपादन आदर्श हिवरे बाजारचे माजी सरपंच तथा राज्यस्तरीय आदर्श गाव समितीचे अध्यक्ष पोपटराव पवार यांनी केले.
कटंगीकला येथील मयूर लॉनमध्ये १९ मार्च रोजी जिल्हास्तरीय सरपंच मेळावा व स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) कार्यशाळेत आमचा गांव आमचा विकास या विषयावरील कार्यशाळेत प्रमुख मार्गदर्शक म्हणून ते बोलत होते. यावेळी दुसरे प्रमुख मागदर्शक म्हणून नांदेड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिमन्यू काळे यांची उपस्थिती होती.
पिकांसाठी पाण्याचे योग्य नियोजन केले तरच संकटावर मात करणे शक्य असल्याचे सांगून श्री.पवार पुढे म्हणाले, जिल्हा जलसंपन्न असला तरी भविष्यात मराठवाड्यासारखी पाणी टंचाई निर्माण होऊ शकते. पाण्याच्या व्यवस्थापनाच्या बाबतीत ग्रामस्थांनी पुढाकार घेऊन नियोजन करण्याची आवश्यकता आहे. गावात पडणाऱ्या पावसाचा प्रत्येक थेंब अडविला पाहिजे. गाव स्वयंपूर्ण करण्यासाठी उत्तम आरोग्य, चांगले शिक्षण, शुद्ध पिण्याची पाणी, चांगल्या प्रकारची शेती आणि गावात सदभावनापूर्ण वातावरण असणे महत्वाचे आहे. गावाच्या विकासाच्या दृष्टीने यंत्रणा ही सक्रीय असली पाहिजे. ग्रामसभा ही तेव्हाच यशस्वी होते जेव्हा सरपंच, सचिव आणि ग्रामसभेचा प्रत्येक सदस्य स्वत:ला झोकून देऊन विकासाच्या नियोजनाचे काम करतात.
गावाच्या विकासासाठी ग्रामस्थांच्या एकजूटीची आवश्यकता विशद करुन श्री. पवार म्हणाले, ग्रामपंचायत ही गावाची मंदीर झाली पाहिजे. सर्वसामान्य व्यक्तीला अन्न, वस्त्र, निवारा, आणि पिण्याचे पाणी देणारी व्यवस्था ग्रामपंचायतमधून निर्माण झाली पाहिजे. ग्रामविकासाची कुंडली लोकप्रतिनिधींनी तयार केली पाहिजे. या कुंडलीमध्ये शिक्षण, आरोग्य, पिण्याचे पाणी, सिंचनाची व्यवस्था आणि रोजगार निर्मितीचे नियोजन असले पाहिजे तरच ग्रामविकासाला चालना मिळेल असा विश्वास व्यक्त करुन पोपटराव पुढे म्हणाले, जिल्ह्यात वनालगतच्या गावातील संयुक्त वन व्यवस्थापन समित्यांची सक्रीयपणे गावाच्या विकासात आपले योगदान दयावे.
या कार्यशाळेला जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती समित्यांचे सभापती, उपसभापती, सदस्य, ग्रामपंचायतचे सरपंच, उपसरपंच यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.