पालकमंत्र्यांनी घेतली मृतकाच्या परिवाराची व रुग्णांची भेट

0
7

देवरी,दि.२०  तालुक्यातील ककोडी येथील मंडईत १५ मार्च रोजी मिष्ठान व गुपचून खाल्ल्याने अनेकांना विषबाधा झाली. ककोडी येथील महेश कपुरडेहरिया (१२ वर्ष) या बालकाचा उपचारादरम्यान चिचगड येथील रुग्णालयात मृत्यू झाला. या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पालकमंत्री राजकुमार बडोले आणि देवरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार संजय पुराम यांनी १९ मार्च रोजी कपुरडेहरिया कुटुंबियाची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले व परिवारास आर्थिक मदत केली. मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून सुद्घा आर्थिक मदत करण्याचे आश्वासन सुद्घा आमदार पुराम यांनी दिले.
ककोडी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार घेत असलेल्या रुग्णांची भेट घेऊन घटनेविषयी सविस्तर माहिती जाणून घेतली. काही रुग्ण उपचार घेत असून काही रुग्णांच्या प्रकृतीत सुधारणा झाल्यामुळे त्यांना सुट्टी देण्यात आली. सुट्टी दिल्यानंतर सुद्धा काही रुग्णांना बरे वाटत नसल्यामुळे ते पुन्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल झाल्याचे रुग्णांनी पालकमंत्र्यांना यावेळी सांगितले.
पालकमंत्र्यांनी यावेळी तालुका आरोग्य अधिकारी डॉ.हुमने यांना परिस्थितीवर नियंत्रण ठेवून रुग्णांवर योग्य उपचार करण्याचे तसेच काही अडचणी भासल्यास वरिष्ठ वैद्यकीय अधिकाऱ्यांचे मार्गदर्शन घेऊन रुग्णांना मदत करण्यास सांगितले.
यावेळी पालकमंत्र्यांसमवेत आमदार संजय पुराम, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.हरिष कळमकर, ककोडी सरपंच रियाज खान, भाजपचे जिल्हा महामंत्री विरेंद्र अंजनकर, जि.प.सदस्य अलताफ हमीद यांचेसह अनेकांची उपस्थिती होती.