नाग विदर्भ चेम्बर ऑफ कॉर्मसवर प्रशासक

0
12

नागपूर-विदर्भातील १३ लाख व्यापार्‍यांची संघटना असलेल्या नाग विदर्भ चेम्बर ऑफ कॉर्मसवर ‘नॅशनल कंपनी लॉ ट्रिब्युनल’ने (एनसीएलटी) प्रशासक नेमण्याचे आदेश दिले आहेत.
चेम्बरचे माजी अध्यक्ष दीपेन अग्रवाल यांच्या नेतृत्वात सर्व माजी अध्यक्षांनी विद्यमान कार्यकारिणीविरुद्ध लढा सुरू केला होता. विद्यमान अध्यक्ष अश्‍विन प्रकाश मेहाडिया यांच्या कारभाराला एनसीएलटीत आव्हान दिले होते. १५ डिसेंबर २0२२ रोजी झालेल्या सुनावणीत कार्यकारिणीला नोटीस देऊन दोन आठवड्यात उत्तर सादर करण्यास सांगितले होते. २७ डिसेंबर २0२२ रोजी विशेष न्यायालयाने घेतलेल्या सुनावणीत ३१ जानेवारी २0२३ तारीख दिली. याप्रकरणी मंगळवारी झालेल्या सुनावणीत एनसीएलटीने दोन्ही बाजू ऐकून घेतल्यानंतर प्रशासक नियुक्त करण्याचे आदेश दिले. या आदेशाला एनव्हीसीसीची विद्यमान कार्यकारिणी न्यायालयात आव्हान देणार असल्याचे सांगण्यात येत आहे. मागील काही दिवसांपासून एनव्हीसीसीमध्ये अंतर्गत धुसफूस सुरू आहे. त्याचा स्फोट आमसभेत झाला होता. १७ डिसेंबर २0२२ रोजी झालेल्या चेंबरच्या आमसभेत आजी-माजी पदाधिकार्‍यांमध्ये चांगलाच संघर्ष झाला होता. विद्यमान अध्यक्ष अश्‍विन प्रकाश मेहाडिया यांच्यासह विद्यमान कार्यकारिणीच दुसर्‍यांदा निवडून आली. त्यावर माजी पदाधिकार्‍यांनी आक्षेप घेतला होता. माजी अध्यक्षांसह पदाधिकार्‍यांचे काहीही ऐकून घेण्यात न आल्यामुळे ते बहिष्कार टाकून बाहेर पडले होते. तेव्हा चांगलाच तणाव निर्माण झाला होता. विद्यमान अध्यक्ष अश्‍विन प्रकाश मेहाडिया यांच्या एककल्ली कारभाराविरोधात माजी अध्यक्ष दीपेन अग्रवाल यांच्या नेतृत्वात अकरा माजी अध्यक्षांनी सोमवार, ५ डिसेंबर रोजी दुपारी हल्लाबोल आंदोलनही केले होते.