राज्यातील विद्यापीठे व महाविद्यालयांचा बेमुदत बंद आंदोलन

0
24

१९ फेब्रुवारी रोजी भिसी येथे निर्धार सभेचे आयोजन .

गोंदिया : राज्यातील अकृषी विद्यापीठे व महाविद्यालयीन शिक्षकेत्तर कर्मचारी यांच्या विविध प्रलंबीत मागण्या घेवून, महाराष्ट्र राज्य
विद्यापीठीय व महाविद्यालयीन सेवक संयुक्त कृती समिती चे वतीने २ फेब्रुवारी २०२३ पासुन परीक्षेच्या कामकाजांवर बहिष्कार टाकुन
आंदोलनाला सुरूवात करण्यात आली. सेवाअंतर्गत सुधारीत आश्वासित प्रगती योजनेचा रद्द केलेला शासन निर्णय पुनर्जिवित करणे, सातव्या वेतन आयोगातील तरतुदीनुसार १०/२०/३० वर्षानंतरच्या लाभाची योजना विद्यापीठ व महाविद्यालयीन शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना लागु करणे, सातव्या वेतन आयोगापासुन वंचीत असलेल्या १४१० विद्यापीठ शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना वेतन आयोग लागु करून १ जानेवारी २०१६ प्रत्यक्ष
सातवा वेतन आयोग लागु झाला त्या दरम्यानची फरकाची थकबाकी
अदा करणे, विद्यापीठ व महाविद्यालयीन शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांची रिक्त असलेली पदे भरण्यास मान्यता देणे, २००५ नंतर सेवेत रूजू झालेल्या कर्मचाऱ्यांना जुनी पेंशन योजना लागू करणे, विद्यापीठ शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना सहाव्या वेतन आयोगाची वेतनश्रेणी गृहीत धरून त्या आधारे सातवा वेतन आयोगाची वेतनश्रेणी लागू करणे अशा सहा
मुख्य व इतर प्रलंबीत मागण्या घेवून आंदोलन सुरू आहे.
यानंतरही या मागण्यांची दखल घेवून मागण्या मान्य न
झाल्यास संपूर्ण राज्यातील अकृषी विद्यापीठे व महाविद्यालयीन
शिक्षकेत्तर कर्मचारी २० फेब्रुवारी २०२३ पासून बेमुदत काम बंद आंदोलन सुरू करणार असुन या आंदोलनाचा निर्धार, १९ फेब्रुवारी २०२३ च्या कला व वाणिज्य महाविद्यालय भिसी येथील सभेत करण्यात येणार आहे.
या निर्धार सभेकरीता महाराष्ट्र राज्य विद्यापीठीय व महाविद्यालयीन सेवक संयुक्त कृती समिती चे अध्यक्ष अजय देशमुख, संघटक प्रकाश म्हसे, मुख्य संघटक रावसाहेब त्रिभुवन, मुख्य संघटक रा.जा.बढे हे मार्गदर्शन करणार असुन प्रवर्तक आनंदा अंकुश, समन्वयक संदिप हिवरकर, गोंडवाना विद्यापीठ कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष मनोज जाधव व अधिसभा सदस्य सतिश पडोळे इत्यादी पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. १९ फेब्रुवारी २०२३ रोजी होणाऱ्या या निर्धार सभेकरीता राज्यातील संबंधित सर्व पदाधिकारी व सर्व कर्मचाऱ्यांनी बहुसंख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन गोंदिया जिल्हा अशासकीय महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष गुलशन बारसागडे व सचिव तुषार लिचडे विदर्भ अशासकीय शिक्षकेतर कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष शामराव पंचवटे व महासचिव संदीप हिवरकर यांनी केले आहे