अभियांत्रिकी व वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या पुर्वतयारीसाठी तंत्रज्ञानाचा वापर करा – आमदार विनोद अग्रवाल

0
14

147 मागासवर्गीय विद्यार्थ्यांना टॅबचे वाटप

       गोंदिया, दि.24 : आजचे युग हे स्पर्धेचे युग आहे. स्पर्धेत टिकण्यासाठी विद्यार्थ्यांना अद्ययावत व पुरेसे ज्ञान असणे आवश्यक आहे. त्यामुळे अभियांत्रिकी, वैद्यकीय व इतर उच्च शिक्षणाच्या अभ्याक्रमाच्या पुर्वतयारीसाठी विद्यार्थ्यांनी तंत्रज्ञानाचा वापर करावा, असे प्रतिपादन आमदार विनोद अग्रवाल यांनी केले.

         डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, गोंदिया येथील सभागृहात सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत सहाय्यक आयुक्त समाज कल्याण गोंदिया व महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था (महाज्योती) नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने जेईई, नीट, एमएएच-सीईटी परीक्षेचे प्रशिक्षण घेणाऱ्या दहावी उत्तीर्ण झालेल्या मागासवर्गीय विद्यार्थ्यांना मोफत टॅबलेट (कव्हर, ईअरफोन, डाटा सीमकार्ड 6 GB प्रति दिवस नेट डाटा दोन वर्षाकरीता) श्री. अग्रवाल यांचे हस्ते वाटप करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते.

         प्रमुख अतिथी म्हणून उपायुक्त तथा जिल्हा जात पडताळणी समितीचे सचिव राजेश पांडे व समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त विनोद मोहतुरे मंचावर उपस्थित होते.

         तंत्रज्ञानाच्या माध्यमातून ज्या विद्यार्थ्यांना आज टॅब मोफत मिळालेले आहे त्या सर्व विद्यार्थ्यांनी सदर टॅबचा वापर करुन त्याचा फायदा घेऊन आपल्या ज्ञानामध्ये भर पाडावी. तसेच सदर टॅबचा आपल्या पुढील शिक्षणाकरीता योग्य तो वापर करुन आपले भविष्य उज्ज्वल करावे. गोंदिया मतदारसंघात 86 ग्रामपंचायत आहेत. यावर्षी गोंदिया मतदारसंघातील विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेची तयारी करण्यासाठी 10 लाख रुपयांची पुस्तके वितरीत करण्याचे त्यांनी यावेळी आश्वासीत केले.

         दहावी उत्तीर्ण झालेल्या मागासवर्गीय विद्यार्थ्यांना अभियांत्रिकी, वैद्यकीय व इतर उच्च शिक्षणाकरीता पुर्वपरीक्षांची पुर्वतयारी करण्याकरीता आज सन 2024 च्या बॅचमधील एकूण 147 विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते टॅबचे वाटप करण्यात आले. जेणेकरुन सध्याच्या स्पर्धेच्या युगात इतर मागासवर्गीय, विमुक्त जाती, भटक्या जमाती आणि विशेष मागास वर्ग प्रवर्गाच्या मागासवर्गीय विद्यार्थ्यांना परीक्षेच्या पुर्वतयारीसाठी सराव करण्यास या माध्यमातून मदत होणार आहे.

         महाज्योती मार्फत महाराष्ट्रातील इतर मागास वर्ग, विमुक्त जाती-भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गाच्या विद्यार्थ्यांना स्पर्धात्मक युगात समान संधी प्राप्त व्हावी या हेतूने पोलीस भरती पुर्व प्रशिक्षण, जेईई, नीट, एमएचटी-सीईटी, एम.पी.एस.सी., यु.पी.एस.सी. आदी स्पर्धात्मक परीक्षांचे प्रशिक्षण देण्यात येते. उमेदवारांना रोजगाराची संधी मिळावी याकरीता कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रम राबविण्यात येतो तसेच विविध संशोधन कार्याला प्रोत्साहन मिळावे याकरीता पीएचडी व एम.फिल. करणाऱ्या उमेदवारांना अधिछात्रवृत्ती प्रदान करण्यात येते. असे प्रास्ताविकातून समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त विनोद मोहतुरे यांनी सांगितले.

       प्रारंभी महात्मा ज्योतिबा फुले, राजर्षी शाहू महाराज, डॉ.बाबासाहेब आंबेडकर व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस माल्यार्पण करुन व दीप प्रज्वलन करुन कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.

       कार्यक्रमाचे सुत्रसंचालन समाज कल्याण निरीक्षक श्रीमती स्वाती कापसे यांनी केले तर उपस्थितांचे आभार लक्ष्मण खेडकर यांनी मानले. कार्यक्रमास सहाय्यक लेखाधिकारी संजय भांडारकर प्रामुख्याने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अमेय नाईक, विद्या मोहोड, निवास सहारे, लक्ष्मण राऊत, हेमंत घाटघुमर, विद्या मेश्राम व सुरेन्द्र बडोले यांनी परिश्रम घेतले.