चिल्हाडी-मुरमाडी रस्ता ठरतोय अपघाताला आमंत्रण देणारा

0
35

विनोद सुरसावंत ककोडी,दि.२६ः- देशाच्या  विकासात रस्त्यांची महत्वाची भूमिका असते.त्यामुळेच स्मार्ट सिटी, बुलेट ट्रेनचे स्वप्न बघितले जाते.मात्र देशाच्या स्वातंत्र्याचा ७५ वर्षानंतरही नागरिकांना रस्त्यासाठी संघर्ष करावा लागत असल्याचे चित्र देवरी तालुक्यातील आदिवासीबहूल असलेल्या ककोडी परिसरातील गावांचे चित्र आहे.चिल्हाटी,मुरमाडी या दोन गावांना जोडणारा रस्ता म्हणजे अपघाताला निमंत्रणच म्हणायची वेळ आली आहे.नक्षलग्रस्त आदिवासी भागातील चिल्हाटी,मुरमाडी या दोन गावांना जोडणारा तिन किलोमीटरच्या मुख्य मार्गाची पूर्णतः दुरावस्था झाल्याने जागोजागी मोठमोठे खड्डे पडून रस्ता उखडला गेला आहे.उखडलेल्या रस्त्यावरुन वाहन चालवितांना चांगला रस्ता शोधत प्रवास करण्याची वेळ प्रवाशांवर आली आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे या दोन्ही गावातील, तसेच तुमडीकसा, कथलिटोला येथील विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी ककोडीला याच मार्गाने जावे लागते.विद्यार्थ्यांना आपला जिव मुठीत घेऊन य़ा रस्त्याने प्रवास करण्याची वेळ आली आहे.चिल्हाटी आणि मुरमाडी दोन्ही स्वतंत्र ग्राम पंचायतींना जोड़णारा रस्ता दुरुस्त करण्याकरीता या भागातील लोकप्रतिनिधींची मात्र उदासिनता दिसून येत आहे.