सप्रअवर कनिष्ठ प्रशासन अधिकारी भारी

0
62

जलजीवन मिशनच्या कार्यक्रमात मर्जितील कर्मचारी वरचढ

गोंदिया, — जिल्हा परिषदेच्या जलजीवन मिशन कार्यक्रमांतर्गत जिल्हा पाणी व स्वच्छता मिशनच्या वतीने 28 फेब्रुवारी रोजी सरपंच परिषद प्रशिक्षण व संकल्प मेळावा घेण्यात आला. त्याकरिता कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात आली होती. मात्र ती नेमणूक करताना देखील कर्मचाऱ्यांना सापत्न वागणूक देण्यात आल्याचे बघावयास मिळाले. सहाय्यक प्रशासन अधिकाऱ्याला नोंदणीवर बसविण्यात आले. तर कनिष्ठ प्रशासन अधिकाऱ्याला संपूर्ण कार्यक्रमाची देखरेख करण्याची जबाबदारी देण्यात आली. त्यामुळे वरिष्ठ कर्मचाऱ्यांची गळचेपी करण्याचे धोरण तर नाही, असा सवाल उपस्थित होत आहे.

जिल्ह्यातील ग्राम पंचायतींची निवडून नुकतीच पार पडली. त्यात थेट सरपंच निवडण्यात आले. जिल्ह्यातील सरपंचांना गावगाड्याचा कारभार हाकताना अडचणींचा सामना करावा लागू नये. त्यांचे कार्य व नियम यांची माहिती व्हावी तसेच शासनाच्या विविध योजनांची माहिती समजावून देण्याकरिता जल जीवन मिशन अंतर्गत जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन अंतर्गत बालाघाट मार्गावरील ग्रीन लॅंड सभागृहात जिल्हास्तरीय सरपंच परिषद तसेच प्रशिक्षण व संकल्प मेळावा घेण्यात आला. या कार्यक्रमाच्या नियोजनाकरिता अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर जबाबदारी निश्चित करून देण्यात आली. या संपूर्ण कार्यक्रमाचे नियोजन पाणी व स्वच्छता मिशनचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी नरेश भांडारकर केले. मात्र मेळाव्याकरिता ज्या कर्मचाऱ्यांची सेवा घेण्यात आली. ती घेताना दुजाभाव करण्यात आल्याचा आरोप दबक्या आवाजात होत आहे. सहाय्यक प्रशासन अधिकारी हे मोठे पद असताना या पदावर असलेले पी. जी. शहारे यांना मेळाव्यात येणाऱ्यांची उपस्थिती नोंदविण्याच्या कामात घेण्यात आले. उलटपक्षी कनिष्ठ प्रशासन अधिकारी असलेल्या सौरभ अग्रवाल यांची गोंदियात कुठेच पदनिश्चिती नसताना त्यांना संपूर्ण मेळाव्याचे समन्वय व समितीच्या कामकाजावर नियंत्रण ठेवण्यासाठी नेमणूक करण्यात आली. हा दुजाभाव करण्यामागे विशिष्ट हेतू तर नाही, असा सवाल यानिमित्ताने उपस्थित करण्यात येत आहे.