आदिवासी बांधवांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी पोलिस विभाग प्रयत्नशील : पाटील

0
24

गोंदिया-जिल्ह्यातील अतिसंवेदनशील असलेल्या दुर्गम भागातील आदिवासी जनतेला शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळवून देवून त्यांना विकासाच्या मुख्यप्रवाहात आणाण्यासाठी पोलिस विभाग प्रयत्नशील आहे. मिशन शिखर, दादालोरा अशा अनेक योजनांतून आदिवासी बांधवांना जोडण्याचे काम पोलिस करीत आहे. जिल्ह्याच्या नक्षलग्रस्त भागातील प्रत्येक आदिवासींचे आधारकार्ड, बँक अकाउंट व जात प्रमाणपत्र हे तीन दाखले तत्परतेने बनवून देण्याची जबाबदारी गोंदिया पोलिसांनी घेतली आहे. या कागदपत्राच्या आधारे त्यांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळवून दिला जाणार असल्याचे गडचिरोली परिक्षेत्राचे पोलिस उपमहानिरीक्षक संदीप पाटील यांनी शुक्रवारी (दि.३) येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिली.
पोलिस अधीक्षक कार्यालयातील सभागृहात आयोजित पत्रपरिषदेत ते बोलत होते. यावेळी पोलिस अधिक्षक निखिल पिंगळे, अपर पोलिस अधीक्षक अशोक बनकर उपस्थित होते. यावेळी पोलिस अधीक्षक पिंगळे यांनी माहिती देतांना सांगितले की, १५0 आदिवासी तरुणांना पोलिस भरतीपूर्व प्रशिक्षण देण्यात आले. त्यातील ३८ ते ४0 तरुण हे पोलिस भरतीत चांगल्या गुणांनी समोर आले आहेत. आता लेखी परीक्षेतील यशानंतर किती पोलिस म्हणून पुढे येतात हे कळेल. मिशन शिखर अंतर्गत देवरी येथे ४0 पैकी १७ युवक जेईईई साठी निवडले गेले आहेत. गोठणगाव व बिजेपार भागातील विद्यार्थी फार चांगली मेहनत घेवून पुढे येत आहे. गडचिरोली भागात विकास व प्रगती या प्रकल्पासारखे कार्य केले जात आहे. गोंदिया जिल्ह्यात युवकांसाठी साहित्य किट वाटप, रोजगार मेळावे, कौशल्य विकास प्रशिक्षण सारखे अनेक कार्य सुरू आहेत. विशेष म्हणजे रोजगार मेळाव्यातून सुरक्षा रक्षकासाठी १२८ युवकांना नोकरी प्राप्त झाली आहे. यासह नुकत्याच सुरू करण्यात आलेल्या चॉर्ली स्कॉडचे चांगले परिणाम नजिकच्या काळात दिसून येतील. शहरातील वाहतूकीच्या बाबतीत निर्णय घेतला गेला असून ३ तासासाठी पार्कींग प्लाझामध्ये कुठलेही शुल्क आकारले जाणार नाही. हळूहळू याचा प्रचार प्रसार होऊन वाहन लावण्याची लोकांना सवय लागेल असेही पोलिस अधिक्षक पिंगळे म्हणाले.