प्रकल्पांतर्गत समुदाय आधारित संस्थाकरीता  जिल्हास्तरीय कार्यशाळेचे आयोजन

0
8

गोंदिया, दि.7 :  जिल्हा परिषदेच्या सभागृहात बाळासाहेब ठाकरे कृषि व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन (स्मार्ट) प्रकल्प अंतर्गत मोबिलायझेशन व सेंसेटायझेशन घटकांअंतर्गत समुदाय आधारित संस्थाकरीता एक दिवशीय जिल्हास्तरीय कार्यशाळेचे आयोजन प्रमुख जिल्हा अंमलबजावणी कक्ष स्मार्ट गोंदिया मार्फत जिल्हा अंमलबजावणी कक्ष स्मार्ट तथा प्रकल्प संचालक आत्मा हिंदुराव चव्हाण यांचे अध्यक्षतेखाली करण्यात आले.

       कार्यक्रमास जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक उदय खर्डेनवीस, माविमचे जिल्हा समन्वय अधिकारी संजय संगेकर, नाबार्डचे जिल्हा विकास व्यवस्थापक अविनाश लाड, बँक ऑफ महाराष्ट्रचे जिल्हा व्यवस्थापक सुशीला सुरीन, कृषि विज्ञान केंद्र हिवराचे वरिष्ठ शास्त्रज्ञ तथा प्रमुख सय्यद अली,  नोडल अधिकारी तथा पुरवठा व मुल्यसाखळी तज्ञ कावेरी साळे, विभागीय अंमलबजावणी कक्ष स्मार्टचे अर्थसल्लागार सत्यपाल ठाकरे, महाराष्ट्र सहकार विकास महामंडळाचे विभागीय व्यवस्थापक दिपक बेदरकर, कृषि विज्ञान केंद्र हिवराचे प्रयोगशाळा तंत्रज्ञ गणेश खेडीकर, गणेश ग्रामीण संस्थेचे विजय बहेकार, राजगिरी बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या रजनी रामटेके आदी मार्गदर्शक म्हणून उपस्थित होते.

        या कार्यशाळेच्या माध्यमातून सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्यापासून ते समुदाय आधारित संस्थाचे व्यवसाय सुरु करणे व त्यांना योग्य मुल्यसाखळीमध्ये जोडण्याचे काम या प्रकल्पाचा मुख्य उद्देश आहे असे सांगून सर्व समुदाय आधारीत संस्स्थांनी विविध विभागाच्या योजनांचा पुरेपूर लाभ घ्यावा जेणेकरुन उत्पादीत मालाला योग्य भाव मिळून आर्थिक प्रगती साधता येईल, असे  प्रास्ताविकातून हिंदुराव चव्हाण यांनी सांगितले.

        सदर स्मार्ट प्रकल्पाबाबत सविस्तर मार्गदर्शन करुन या प्रकल्पामध्ये भाग घेण्याकरीता आवश्यक कागदपत्रांविषयी तसेच प्रधानमंत्री सुक्ष्म अन्न प्रक्रिया योजनेविषयी कावेरी सावळे यांनी माहिती दिली.

        नाबार्ड मार्फत शेतकऱ्यांकरीता राबविण्यात येणाऱ्या योजनांची माहिती देऊन कृषि पायाभुत सेवा सुविधा योजनेविषयी आविनाश लाड यांनी सविस्तर माहिती दिली.

       प्रकल्प आराखडा कसा असावा, प्रकल्प अहवालामध्ये कोणकोणत्या बाबींचा समावेश करणे गरजेचे आहे तसेच समुदाय आधारीत संस्थांना लागणाऱ्या कागदपत्रांविषयी सत्यपाल ठाकरे यांनी मार्गदर्शन केले.

       सदर प्रकल्पामध्ये बँक कर्जाकरीता लागणाऱ्या आवश्यक कागदपत्रांविषयी सुशीला सुरीन यांनी विस्तृत माहिती दिली.

       उद्योजक व्हावे असे आवाहन करुन गोंदिया जिल्ह्यात हळद, ऊस प्रक्रिया (गुळ) उद्योगास भरपुर वाव असल्याचे सय्यद अली यांनी सांगितले.

       सहकार विभागातील शेतकऱ्यांच्या लाभाच्या योजनेविषयी माहिती देऊन मुल्यवर्धीत मालाची निर्यातीकरीता प्रयत्न करणे गरजेचे असल्याचे दिपक बेदरकर यांनी सांगितले. रजनी रामटेके यांनी कृषि क्षेत्रात उद्योगासंबंधी प्रोत्साहनपर भाष्य केले. विजय बाहेकर यांनी सदर प्रकल्पाबाबत उपस्थितांना विस्तृत माहिती दिली. उदय खर्डेनवीस यांनी बँकेमार्फत येणाऱ्या समस्या जाणून घेतल्या व उपस्थितांना बँकेमार्फत परिपूर्ण सहकार्य करण्यात येईल असे सांगितले.

       सदर जिल्हास्तरीय कार्यशाळेला गोंदिया जिल्ह्यातील 28 शेतकरी उत्पादक कंपन्यांचे संचालक/सभासद, कृषि विभागातील अधिकारी/कर्मचारी व आत्माचे सर्व अधिकारी/कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन सहायक तंत्रज्ञान व्यवस्थापक (आत्मा) अरविंद उपवंशी यांनी केले, तर उपस्थितांचे आभार स्मार्ट प्रकल्पाचे अर्थसल्लागार सचिन कुंभार यांनी मानले.