प्रधानमंत्री सुक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेअंतर्गत जिल्हास्तरीय कार्यशाळा

0
11

गोंदिया, दि.10 : आत्मनिर्भर भारत पॅकेज अंतर्गत प्रधानमंत्री सुक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना गोंदिया जिल्ह्यामध्ये सन 2020-21 ते 2024-25 या पाच वर्षाच्या कालावधीत राबविण्यात येत आहे. या योजनेअंतर्गत दिनांक 8 ते 14 मार्च 2023 या कालावधीत कृषि प्रक्रिया सप्ताह राबविण्यात येत आहे. सदर सप्ताहाअंतर्गत 8 मार्च 2023 रोजी जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी कार्यालय गोंदिया व महिला आर्थिक विकास महामंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने माविम कार्यालयाच्या सभागृहात जिल्हास्तरीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी हिंदुराव चव्हाण, माविमचे जिल्हा समन्वय अधिकारी संजय संगेकर, सहायक जिल्हा समन्वय अधिकारी सतीश मार्कंड, वरिष्ठ शास्त्रज्ञ तथा कृषि विज्ञान केंद्र हिवरा चे प्रमुख डॉ.शाकीर अली सय्यद, कृषि उपसंचालक धनराज तुमडाम, तंत्र अधिकारी कावेरी साळे, माविम येथील सर्व महिला व संसाधन व्यक्ती, कर्मचारी उपस्थित होते.

प्रधानमंत्री सुक्ष्म अन्न प्रक्रिया योजनेबाबत नोडल अधिकारी धनराज तुमडाम यांनी मार्गदर्शन केले. तसेच वैयक्तिक लाभार्थी निवडीचे निकष व योजनेअंतर्गत कोणत्या प्रकल्पांकरीता अर्ज करु शकतो यावर चर्चा करण्यात आली. हिंदूराव चव्हाण यांनी सामाईक पायाभुत सुविधा या घटकांअंतर्गत अर्ज करण्याबाबत आवाहन केले. तसेच कार्यशाळेमध्ये बँकेकडे प्रलंबीत प्रकरणांचा आढावा घेऊन सदर प्रस्तावांकरीता पाठपुरावा करण्याबाबत संबंधीत जिल्हा संसाधन व्यक्ती यांना सूचित केले.

यावेळी मान्यवरांच्या हस्ते ममता पवन ब्राम्हणकर (डेअरी उत्पादने) या लाभार्थ्याचा सत्कार तसेच उत्कृष्ट काम केलेल्या कुंजलता भुरकुडे, पुस्तकला खैरे या संसाधन व्यक्ती यांचा सत्कार करण्यात आला. या योजनेअंतर्गत दिनांक 8 ते 14 मार्च 2023 या कालावधीत कृषि प्रक्रिया सप्ताह राबविण्यात येत आहे. सदर सप्ताहाचा व योजनेचा जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी हिंदुराव चव्हाण यांनी केले आहे.