गोंदिया, आमगाव, सालेकसा राज्य मार्ग 335 वरील जड वाहतुकीसाठी पुलावरील वाहतूक बंद  : मनाई आदेश जारी

0
30

 गोंदिया, दि.13 : गोंदिया, आमगाव, सालेकसा राज्य मार्ग 335 वरील कि.मी. 238/205 मधील पुलाच्या स्ट्रक्चरल ऑडिट हे व्हीएनआयटी नागपूर यांनी 16 मे 2018 रोजी केले असून स्ट्रक्चरल ऑडिट अहवाल सादर केला आहे. या अहवालात दिलेल्या निर्देशानुसार पुलावरील जड वाहतुक त्वरित बंद करणे गरजेचे असून या पुलावरील वाहतूक पर्यायी रस्त्याने वळविणे गरजेचे असल्याचे तसेच सदर पुल जास्त धोकादायक झाल्याने पुलावरील जड वाहतूक त्वरित थांबवून पर्यायी रस्त्याने वळविणे आवश्यक असल्याचे एका पत्रान्वये कार्यकारी अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग क्र.1, गोंदिया यांनी कळविले आहे.

        नागरिकांच्या सार्वजनिक सुरक्षिततेच्या दृष्टीने नागरिकांच्या जिवितास धोका होऊ नये याकरीता जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी चिन्मय गोतमारे यांना प्रदान करण्यात आलेल्या मोटार वाहन अधिनियम 1988 चे कलम 115 नुसार प्रदान करण्यात आलेल्या अधिकारान्वये गोंदिया जिल्ह्यातील गोंदिया, आमगाव, सालेकसा राज्य मार्ग 335 वरील कि.मी. 238/205 मधील पुलाच्या गंभीर स्थितीमुळे तेथील जड वाहतूक वळविण्याबाबत व जड वाहतुकीसाठी पुलावरील वाहतूक बंद करण्याबाबत मनाई आदेश जारी केले आहे.

        वरील आदेशाच्या पार्श्वभूमीवर कार्यकारी अभियंता, सार्वजनिक बांधकाम क्र.1, गोंदिया यांनी उपप्रादेशिक परिवहन अधिकारी गोंदिया, संबंधीत पोलीस निरीक्षक व संबंधीत ट्राफिक पोलीस यांच्या मदतीने आवश्यक त्या ठिकाणी सूचनात्मक वाहतूक चिन्हे, बोर्ड लावून घ्यावेत. असे जिल्हाधिकारी तथा ‍  जिल्हादंडाधिकारी चिन्मय गोतमारे यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे कळविले आहे.