शस्त्रधारी गुंडांनी केला आपल्या घरावर हल्ला-अंकिता शिव शर्मा

0
7

14
गोंदिया,दि.10-आमदार गोपालदास अग्रवाल यांना शिव शर्मा यांनी सात वाजताच्या सुमारास मारहाण केली. त्यापूर्वी चार ते पाच वाजताच्या सुमारास चार युवक तोंडाला स्कार्फ बांधून घरात शिरले. त्यांच्या हातात तलवार, हॉकी स्टीक आणि दंडुके होते. त्यावेळी घरात शिव शर्मा यांची पत्नी अंकीता शर्मा एकट्याच होत्या. ‘तुझा पती आमदार गोपाल अग्रवाल यांच्या विरोधात बोलतो. त्यांच्या रस्त्यात आडवा येवू नये, अन्यथा त्याला ठार मारु, अशी धमकी देवून ते निघून गेले. याची माहिती माझे पती शिव शर्मा यांना भ्रमणध्वनीवरून दिली. शिव शर्मा यांनी घरी येवून मला धीर दिला. त्यानंतर ते घरून निघून गेले. या प्रकरणाला आमदार गोपालदास अग्रवाल दोषी आहेत, असा आरोप शिव शर्मा यांची पत्नी अंकीता शर्मा यांनी पत्रपरिषदेत केला.
आज त्या पत्रकारांशी बोलत होत्या. शिव शर्मा वास्तव्यास असलेल्या अयोध्या नगरातील साई विला येथे आमदार अग्रवाल यांचे समर्थक शनिवारला सायंकाळी साडेसात वाजताच्या सुमारास ४० ते ५० च्या संख्येने आले. दरम्यान शिव शर्मा यांच्या घरासमोर ठेवलेले चारचाकी वाहन आणि दुचाकीची तोडफोड केली. या प्रकरणाची तक्रार देण्याकरिता अंकीता शर्मा रामनगर पोलिस ठाण्यात रात्री ११ वाजताच्या सुमारास पोहोचल्या. परंतु, त्यांना तब्बल रात्री अडीच वाजतापर्यंत बसवून ठेवण्यात आले. त्यांनी दिलेल्या तक्रारीतून काही भाग वगळण्यात आला. मागणी करून देखील आपल्याला पोलिस संरक्षण देण्यात आले नाही. त्यामुळे रामनगर पोलिस आमदार अग्रवाल यांच्या दबावाखाली काम करत असल्याचा आरोप देखील अंकीता शर्मा यांनी पत्रकारपरिषदेत केला.