कर्मचाऱ्यास मारहाणप्रकरणी काँग्रेस नगरसेवकावर गुन्हा दाखल

0
9

गडचिरोली,  येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात कर्तव्यावर असलेल्या चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यास मारहाण केल्याप्रकरणी पोलिसांनी काँग्रेसचे नगरसेवक नंदू कायरकर यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान मारहाणीचा निषेध म्हणून आज सकाळपासूनच रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी कामबंद आंदोलन पुकारले आहे.  दरम्यान, अमोल तरारे यांच्या तक्रारीवरुन पोलिसांनी नगरसेवक नंदू कायरकर याच्याविरुद्ध कलम ३५३,३२३,५०४ व ५०६ भादंवि अन्वये गुन्हा दाखल केला आहे.

शनिवारी रात्री चंद्रपूर जिल्ह्यातील सिंदेवाही तालुक्यातील राजोली येथील एका मुलीच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने तिला गडचिरोलीच्या जिल्हा सामान्य रुग्णालयात भरती करण्यात आले. प्रथमोपचार केल्यानंतर डॉक्टरांनी रुग्णाला नागपूरला हलविण्याचा सल्ला दिला. यावेळी अपघात विभागात काम करणारे चतुर्थ श्रेणी कर्मचारी अमोल तरारे यांनी रुग्णाला नागपूरला रेफर करण्याची माहिती रुग्णाच्या नातेवाईकांना दिली. मात्र, नातेवाईकांनी रेफर करण्यास मनाई केली त्यानंतर अमोल तरारे हे आपल्या खोलीवर गेले. काही वेळातच कॉंग्रेसचे नगरसेवक नंदू कायरकर यांनी अमोलच्या खोलीवर जाउन त्याला शिवीगाळ करून बेदम मारहाण केली. त्याची छाती व पोटाला दुखापत झाल्याने रुग्णालयात भरती करण्यात आले आहे. या घटनेची माहिती मिळताच चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांनी पोलिसांत तक्रार दाखल करून कामबंद आंदोलन सुरु केले. या आंदोलनामुळे रुग्णांची गैरसोय होत आहे. जोपर्यंत नंदू कायरकर यास अटक होत नाही, तोपर्यंत कामबंद आंदोलन सुरु ठेवण्याचा निर्णय आंदोलकांनी घेतला आहे.