आता ग्रामपंचायतींचे कर स्वीकारणार ऑनलाईन

0
25

गोंदिया- ग्रामपंचायतींच्या कर वसुलीचा वेळेत योग्य विनीयोग व्हावा, या उद्देशाने ग्रामपंचायतींचे कर ऑनलाईन स्विकारण्याचा निर्णय जिल्हा परिषदेच्या २ मे रोजी झालेल्या स्थायी समितीच्या सभेत घेण्यात आला आहे. जिल्हा परिषद अध्यक्षांनी ऑनलाईन कर स्विकारण्याची संकल्पना सभेत मांडली. त्याला सर्व सदस्यांनी एकमताने सहमती दर्शविली. सध्याचे युग माहिती व तंत्रज्ञानाचे आहे.
ऑफलाईन सोडून आता ऑनलाईन माध्यमातून सारी कामे होत आहे. मात्र ग्रामपंचायत स्तरवर होणारे कर अद्यापही ऑफलाईनच गोळा करण्यात येते. त्यामुळे कराची गोळा झालेली रक्कम वेळेत जिल्हा परिषदेकडे पोहोचत नाही. तसेच ग्रामीण भागात ग्रामपंचायत स्तरावर बर्‍याच अडचणी निर्माण होतात. ग्रामपंचायत स्तरावर ऑफलाईन पद्धतीने सर्व प्रकारचा भरणा नागरिक करतात. यामध्ये ग्रामपंचायत परिचर व ग्रामसेवकाकडे कर वसुलीची रक्कम बराच कालावधीपयर्ंत पडून राहते. त्यानंतर ती रक्कम पंचायत समितीमार्फत जिल्हा परिषदेला पाठविण्यात येते. यात बराच वेळ जातो. त्यामुळे कराची रक्कम थेट खात्यात जमा व्हावी, यासाठी जिल्हा परिषद अध्यक्षांनी ऑनलाईन कर स्विकारण्याची संकल्पना मांडली. त्याला सर्व सदस्यांनी एकमताने सहमती दर्शविली. तसेच ऑनलाईन कर वसुलीसाठी सॉफ्टवेअर विकसीत करण्यात येणार असून यामुळे प्रशासनासोबतच नागरिकांचाही मोठा फायदा होणार आहे.