प्रकाश देवतळे यांची काँग्रेस जिल्हाध्यक्ष पदावरून हकालपट्टी,भाजपसोबतची युती भोवली

0
10

चंद्रपूर,दि.05ः एकीकडे राज्यात राजकीय वातावरण ढवळून निघत असतानाच चंद्रपूर जिल्ह्यातील राजकीय फटाके फुटत असून, काँग्रेस पक्षाचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष प्रकाश देवतळे यांची प्रदेश काँग्रेस अध्यक्ष नाना पटोले यांनी हकालपट्टी केली आहे.बाजार समिती निवडणुकीत देवतळे यांनी भाजपसोबत केलेली युती व त्यानंतरचा जल्लोष त्यांना भोवल्याचे प्रदेशाध्यक्षांनी जारी केलेल्या आदेशात स्पष्ट झाले आहे. ग्रामीण जिल्हाध्यक्ष पदावर पुढील नियुक्ती होत पयर्ंत ह्या पदाचा कार्यभार काँग्रेसचे महानगर जिल्हाध्यक्ष रितेश ऊर्फ रामू तिवारी यांचेकडे ग्रामीण जिल्हाध्यक्ष पदाचा अतिरिक्त कार्यभार देण्यात येत असल्याचेही आदेशात स्पष्टपणे नमूद करण्यात आले आहे.
प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी ३ मे २0२३ रोजी जारी केलेल्या पत्रानुसार लोकशाही व संविधान वाचविण्यासाठी तसेच अदानी समूहातील महाघोटाळ्यासंदर्भात पक्षाचे नेते राहुल गांधी यांनी आवाज उठविला. राहुल गांधी भाजपविरोधात थेट संघर्ष करीत असताना भाजपाशी कोणत्याही पध्दतीची हातमिळवणी करणे, स्थानिक पातळीवरील कोणत्याही निवडणुकीमध्ये भाजप किंवा त्यांच्यासोबत सत्तेत सहभागी असलेल्या कोणत्याही पक्षासोबत आघाडी करू नये, अशा स्पष्ट सूचना प्रदेश कार्यालयाकडून देण्यात येऊनही नुकत्याच झालेल्या चंद्रपूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये प्रकाश देवतळे यांनी उघडपणे भाजपसोबत हातमिळवणी करून प्रत्यक्ष सहभाग घेतला, ही बाब पक्षशिस्तीच्या विरोधातली असून प्रदेश काँग्रेसच्या आदेशाला न जुमानणारी आहे. प्रकाश देवतळे ह्यांचे हे कृत्य पक्षविरोधी असल्याने सर्वसामान्य कार्यकर्त्यांमध्ये चुकीचा संदेश गेला आहे. त्यामुळे त्यांना चंद्रपूर ग्रामीण जिल्हा काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षपदावरून कार्यमुक्त करण्यात येत आहे.