बँकांनी जास्तीत जास्त शेतकऱ्यांना पीक कर्ज द्यावे- पालकमंत्री बडोले

0
10

खरीप हंगामपूर्व आढावा बैठक
गोंदिया,दि.19 : जिल्ह्यातील शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी त्यांना विविध पिकांच्या लागवडीसाठी येणारा खर्च लक्षात घेता राष्ट्रीयकृत व जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या शाखांनी जास्तीत जास्त शेतकऱ्यांना मागणीनुसार खरीप पीक कर्ज उपलब्ध करुन दयावे. असे निर्देश पालकमंत्री राजकुमार बडोले यांनी दिले.
१८ एप्रिल रोजी जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात खरीप हंगामपूर्व तयारीचा आढावा घेताना सभेच्या अध्यक्षस्थानावरुन पालकमंत्री बडोले बोलत होते. सभेला आमदार विजय रहांगडाले, जिल्हाधिकारी डॉ.विजय सूर्यवंशी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप गावडे, कृषी सहसंचालक श्री.घावडे, जि.प.उपाध्यक्ष रचना गहाणे, जि.प.कृषी व पशुसंवर्धन समिती सभापती छाया दसरे, प्रभारी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी श्री.चव्हाण यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.
पालकमंत्री बडोले पुढे म्हणाले की, जिल्ह्यात २ लाख ८६ हजार शेतकरी असतांना बँकांनी सन २०१५-१६ च्या खरीप हंगामात केवळ ४३५६३ शेतकरी सभासदांना पीक कर्ज दिले आहे. याबाबत नाराजी व्यक्त करुन ते म्हणाले, यंदाच्या खरीप हंगामात जास्तीत जास्त शेतकरी सभासदांना बँकांनी पीक कर्ज दयावे. बँकांचे अधिकारी व कर्मचारी शेतकऱ्यांशी चांगले बोलत नसून शेतकऱ्यांचे बँक खाते उघडण्यात कुचराई करतात. त्यामुळे असे प्रकार यापुढे खपवून घेणार नाही.
शेतकऱ्यांनी मागणी केल्याप्रमाणे त्यांना कृषी पंपाची जोडणी करुन दयावी असे सांगून पालकमंत्री बडोले पुढे म्हणाले, कृषी पंप जोडणेसाठी निश्चित आराखडा तयार करावा. जिल्ह्यातील कोणताही शेतकरी पंतप्रधान पीक विम्यापासून वंचित राहणार नाही यासाठी या योजनेची माहिती कृषी विभागाने प्रत्येक गावात दयावी. केंद्र व राज्य सरकारच्या विविध योजनांची माहिती तालुका पातळीवर शिबीरातून व ग्रामसभेतून ग्रामस्थांना व शेतकऱ्यांना दयावी. असेही पालकमंत्री बडोले यावेळी म्हणाले.
आमदार रहांगडाले म्हणाले, जिल्ह्यातील जास्तीत जास्त शेतकरी सेंद्रीय शेतीकडे वळला पाहिजे यासाठी कृषी विभागाने शेतकऱ्यांना प्रोत्साहित करावे. जास्तीत जास्त शेतकऱ्यांना पीक कर्जाचा पुरवठा करावा. श्री पद्धतीने धान लागवड करण्यास तसेच भाजीपाला पिके घेण्यास कृषी विभागाने शेतकऱ्यांना मार्गदर्शन करावे. असेही ते यावेळी म्हणाले.

यावेळी प्रभारी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी श्री.चव्हाण यांनी प्रास्ताविकातून सन २०१५-१६ या वर्षात खरीप पेरणी १ लाख ९९ हजार ५०८ हेक्टर क्षेत्रात झाल्याचे सांगितले. ते पुढे म्हणाले, सन २०१६-१७ च्या खरीप हंगामात महाबीजकडून ३० हजार ३०० क्विंटल आणि प्रमाणित खाजगी कंपन्यांकडून १४०५० क्विंटल अशी एकूण ४४ हजार ३५० क्विंटल भात बियाण्यांची मागणी करण्यात आली असून रासायनिक खताची मागणी ६० हजार मेटड्ढीक टन केली असता ६० हजार ७०० मेटड्ढीक टन खते मंजूर झाल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी जिल्हा उपनिबंधक श्री.अहेर यांनी पीक कर्ज वाटप, वीज वितरण कंपनीचे श्री.चव्हाण यांनी कृषी पंपाना वीज जोडणी, सिंचन प्रकल्पातील पाणी व्यवस्थापनाबाबत श्री.छप्परघरे यांनी माहिती दिली.
सभेला जिल्हा अग्रणी प्रबंधक, सिंचन, पाटबंधारे व मध्यम प्रकल्पाचे अधिकारी, उपविभागीय कृषी अधिकारी, तहसिलदार, गटविकास अधिकारी, तालुका कृषी अधिकारी, संबंधित यंत्रणांचे अधिकारी, विविध बँकांचे अधिकारी उपस्थित होते. संचालन देवरीचे उपविभागीय कृषी अधिकारी युवराज शहारे यांनी केले. आभार श्रीमती भोपळे यांनी मानले.