रोहयोच्या कामांचे १५ दिवसात नियोजन करा

0
9

गोंदिया,दि.१9 : जिल्ह्यातील मजूरांना जास्तीत जास्त दिवस रोजगार उपलब्ध करुन देण्यासोबतच रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात विकास कामे करण्यासाठी यंत्रणांनी सन २०१६-१७ या वर्षात करावयाच्या रोहयोच्या कामांचे १५ दिवसात नियोजन करुन ती कामे तातडीने सुरु करावीत. असे निर्देश पालकमंत्री राजकुमार बडोले यांनी दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात  १८ एप्रिल रोजी महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेचा आढावा घेतांना पालकमंत्री बडोले बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी डॉ.विजय सूर्यवंशी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप गावडे, प्रभारी उपजिल्हाधिकारी (रोहयो) नरेंद्र लोणकर यांची प्रमुख उपस्थिती होती.
पालकमंत्री बडोले यावेळी म्हणाले, प्रत्येक यंत्रणेने जिल्ह्यातील आठही तालुक्यात प्रत्येकी ५ याप्रमाणे कामे सुरु करावी. रोहयोची कामे करतांना यंत्रणा उदासीन असल्याचे दिसून येत आहे. ज्या यंत्रणांची कामे कमी प्रमाणात सुरु आहे त्यांना कारणे दाखवा नोटीस दयावी. यंत्रणांनी ही कामे करतांना वेळेचे बंधन पाळावे. यंत्रणांच्या माध्यमातून स्थानिकांना रोजगार उपलब्ध करुन दयावा. रोहयोच्या मजूरांना केलेल्या कामांची मजूरी वेळेतच त्यांच्या खात्यात जमा करावी. यापुढे मजूरी वेळेत मिळत नसल्याच्या तक्रारी मजूरांच्या येणार नाही यादृष्टीने यंत्रणांनी काम करावे.रोहयोची कामे करण्याचे यंत्रणांचे प्रमाण २० टक्के पेक्षाही कमी आहे, ते प्रमाण वाढले पाहिजे.
तालुकास्तरावर तहसिलदारांनी यंत्रणांच्या रोहयो कामाबाबत बैठका घेऊन नियोजन करावे असे सांगून पालकमंत्री बडोले पुढे म्हणाले, रोहयोच्या कामात हयगय करणाऱ्या यंत्रणांच्या अधिकाऱ्यांना जबाबदार धरुन प्रसंगी निलंबनाची कारवाई करण्यात येईल असेही ते म्हणाले.
जिल्हाधिकारी डॉ.सूर्यवंशी म्हणाले, रोहयोच्या कामांची मागणी यंत्रणांनी ८ दिवसाच्या आत करावी. वन विभागाने वनतळ्यांची कामे मोठ्या प्रमाणात हाती घ्यावीत. त्यामुळे वन्यजीवांना पिण्याच्या पाण्याची उपलब्धता होईल. तातडीने कामांची प्रशासकीय मान्यता घ्यावी. रोहयोमधून गुरांचा, बकऱ्यांचा गोठा, शोषखड्डे तसेच प्रायोगिक तत्वावर रेशीम उद्योगाला चालना देण्यासाठी जिल्ह्यातील काही गावांची निवड करण्यात आली असून ऐन व अर्जुन वृक्षांवर टसर किटक पालन तसेच तुतीची लागवड करावी  असेही डॉ.सूर्यवंशी यांनी सांगितले.श्री.गावडे म्हणाले, जिल्हा डास मुक्त करण्यासाठी शोषखड्डयांची कामे रोहयोतून हाती घ्यावीत. २१११ रुपये प्रति शोषखड्डा अंदाजपत्रक तयार करण्यात आले आहे. रोहयोमधून शेतकऱ्यांच्या शेतीतील विहिरींची कामे, शौचालयांची कामे व वैयक्तिक लाभाच्या योजनांची कामे करण्यात यावीत असे ते म्हणाले.

प्रास्ताविकातून प्रभारी उपजिल्हाधिकारी (रोहयो) नरेंद्र लोणकर यांनी जिल्ह्यात रोहयोची कामे मिळविण्यासाठी २ लक्ष २३ हजार ५४० कुटुंबातील ६ लक्ष १९ हजार ३७० मजूरांनी नोंदणी केल्याची माहिती दिली. ग्रामपंचायत स्तरावर ११४४ कामे सुरु असून यावर ३४ हजार ८२७ मजूर तर यंत्रणांच्या २५९ कामांवर ११ हजार ६२५ मजूर कार्यरत असून सन २०१५-१६ वर्षात १८ एप्रिल पर्यंत १२४ कोटी ५७ लक्ष रुपये कामावर खर्च झाल्याचे त्यांनी सांगितले. जिल्ह्यात १ एप्रिल २०१५ ते १८ एप्रिल २०१६ या कालावधीत ७७५ विहिरींची कामे पूर्ण झाली असल्याची माहिती उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्री.भांडारकर यांनी दिली.