नागपूर-हैदराबाद ‘वंदे भारत एक्स्प्रेस’ होणार सुरू

0
13

केंद्रीय रेल्वे मंत्र्यांनी घेतली वन, सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या मागणीची दखल

सेवाग्राम येथे थांब्यासाठीही ना.मुनगंटीवार करणार पाठपुरावा

चंद्रपूर, दि. २५ : नागपूर ते हैदराबाद वंदे भारत एक्स्प्रेस सुरू करण्याबाबत केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांना महाराष्ट्राचे वन, सांस्कृतिक कार्य व मत्स्य व्यवसाय मंत्री ना. सुधीर मुनगंटीवार यांनी नागपूर- हैद्राबाद रेल्वे सुरु करण्याबाबत २० डिसेंबर २०२२ ला पत्र लिहले होते ,या पत्राची दखल घेत नागपूर-हैदराबाद ‘वंदे भारत एक्स्प्रेस’ लवकरच सुरू होणार आहे .

नागपूर आणि हैदराबादचे अंतर ५८१ किलोमीटर आहे. यासाठी सध्याच्या रेल्वेगाड्या सर्वसाधारणपणे दहा तासांचा कालावधी घेतात. नागपूर-हैदराबाद वंदे भारत एक्स्प्रेस सुरू झाल्यास हा कालावधी दहा तासांवरून साडेसहा तासांचा होणार आहे. त्यामुळे नागरिकांना याचा लाभ होणार आहे. ही रेल्वे सुरू करण्याची मागणी ना. मुनगंटीवार यांनी केली होती. नागपूर, गोंदिया, भंडारा, चंद्रपूर या विदर्भातील जिल्ह्यांना नागपूर-हैदराबाद वंदे भारत एक्सप्रेस ट्रेनची प्रतीक्षा होतीच. खासदार रामदास तडस यांच्या मागणीनुसार ना. सुधीर मुनगंटीवार सेवाग्राम येथे वंदे भारत एक्स्प्रेसला थांबा देण्यासाठी पाठपुरावा करणार आहेत. त्यामुळे वर्धा जिल्ह्यातील जनतेसह पाचही जिल्ह्यांतील व्यापारी वर्गाला व नागरिकांना या रेल्वे सेवेचा मोठ्या प्रमाणात लाभ होणार आहे.

सकाळी सहा वाजता नागपूर स्थानकावरून नागपूर-हैदराबाद वंदे भारत रेल्वे सुटणार आहे. दुपारी साडेबारा वाजता ती हैदराबादला पोहोचेल. हैदराबादहुन दुपारी दीड वाजता ही एक्स्प्रेस निघुन रात्री आठ वाजता नागपूर येथे पोहोचेल. या ‘वंदे भारत एक्स्प्रेस’ला  बल्लारशहा, सिरपूर, कागजनगर, रामगुंडम, काझीपेठ या स्थानकांवर थांबा राहणार आहे. आता या गाडीला सेवाग्राम येथेही थांबा देण्यात यावा, यासाठी प्रयत्न सुरू झाले आहे