आत्मा अंतर्गत शेतकऱ्यांच्या गरजेनुरुप शेतकरी प्रशिक्षण

0
8
वाढदिवसाच्या शुभेच्छा

गोंदिया, दि.01 :- कृषि तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) व तालुका कृषि अधिकारी कार्यालय गोंदिया यांच्या संयुक्त विद्यमाने खरीप हंगाम 2023-24 अंतर्गत 31 मे रोजी बनाथर ग्रामपंचायत कार्यालयाच्या सभागृहात शेतकऱ्यांच्या गरजेनुरुप शेतकरी प्रशिक्षण व अहिल्यादेवी होळकर जयंती कार्यक्रम घेण्यात आला.

       कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच फागुलाल नागफासे होते. तर मार्गदर्शक म्हणून तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक (आत्मा) सुनिल खडसे, ग्रामसेवक एन.एस.बावणकर, कृषि सहाय्यक शिल्पा गायधने, जगनटोला येथील प्रगतीशील शेतकरी आत्माराम पाचे उपस्थित होते.

       शेतकऱ्यांच्या गरजेनुरुप शेतकरी प्रशिक्षण कार्यक्रमात सुनिल खडसे यांनी माती परिक्षण, बीज प्रक्रिया व बियाणे उगवण क्षमता चाचणी यावर मार्गदर्शन करुन शेतीपुरक व्यवसाय, सेंद्रिय शेतीबाबत सविस्तर माहिती दिली. तसेच बिजामृत, जिवामृत, दशपर्णी अर्क, ब्रम्हास्त्र कसे तयार करावे व त्याचे फायदे तसेच भात पिकाच्या विविध अवस्थेमध्ये बिजामृत, जिवामृत, दशपर्णी अर्क याचा वापर कसा करावा याबाबत विस्तृत विस्तृत माहिती दिली.

      एन.एस.बावणकर यांनी अहिल्यादेवी होळकर रोपवाटिका, प्रधानमंत्री सुक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना, कृषि विभागाची यांत्रिकीकरण योजना, गोपीनाथ मुंडे अपघात विमा योजना, भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड आदी योजनेबद्दल सविस्तर माहिती दिली. फागुलाल नागफासे यांनी अहिल्यादेवी होळकर यांच्या कार्याचा गौरव करुन महिलांनी त्यांचे कार्य अंगीकृत करुन समाजसेवा करावी असे सांगितले.

       यावेळी मान्यवरांच्या हस्ते अहिल्यादेवी होळकर जयंती निमित्त गावातील तिलोका माने, मनाबाई बाहे, भागवंती माने व गंगाबाई चवरे यांचा शाल, श्रीफळ, स्मृतीचिन्ह व प्रशस्तीपत्र देऊन सत्कार करण्यात आला. याप्रसंगी ग्रामपंचायतच्या परिसरात वृक्षारोपण करण्यात आले.

       कार्यक्रमाचे सुत्रसंचालन माजी सरपंच राजेश माने यांनी केले तर उपस्थितांचे आभार प्रकाश चौव्हाण तेढवा यांनी मानले. कार्यक्रमाला बनाथर व जगनटोला येथील शेतकरी व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.