गाव विकासात ग्रामस्थांची भूमिका महत्त्वाची – जमईवार

0
10

बोंडगावदेवी : गावाच्या सर्वांगीण विकासामध्ये ग्रामस्थांचे योगदान महत्त्वपूर्ण असते. गावामध्ये होणार्‍या लोकोपयोगी कार्यात गावकर्‍यांनी सहभागी होऊन विकासात्मक कामाचा दर्जा टिकाऊ राहण्यासाठी जागरूक राहणे गरजेचे आहे. गावाचा विकास साधण्यासोबतच गावातील काही भागाचे सौंदर्यकरण करण्यासाठी नियोजन करावे. ग्रामस्थांच्या सहयोगाने विकासकार्याला निश्‍चित दिशा मिळते, असा आशावाद पं.स. उच्च श्रेणी खंडविकास अधिकारी नारायण जमईवार यांनी व्यक्त केला.
स्थानिक ग्रामपंचायतच्या वतीने राबविण्यात येणार्‍या भारतीय घटनेचे शिल्पकार विश्‍वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या शतकोत्तर जयंतीप्रीत्यर्थ ग्राम उदय ते भारत उदय दरम्यान राष्ट्रीय पंचायत दिनाप्रसंगी ग्रामसभेत गावकर्‍यांना मार्गदर्शन करीत होते.
सार्वजनिक समाजमंदिरात घेण्यात आलेल्या ग्रामसभेच्या अध्यक्षस्थानी कुसन झोळे होते. याप्रसंगी बीडीओ नारायण जमईवार, सरपंच राधेश्याम झोळे, जि.प. सदस्य कमल पाऊलझगडे, ग्रामसेवक ब्राह्मणकर, उपसरपंच वैशाली मानकर आदी मान्यवर उपस्थित होते.
सर्वप्रथम भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेसमोर दीप प्रज्वलन व पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले. ग्रामपंचायतच्या वतीने १४ ते २४एप्रिलपर्यंत ग्राम उदय ते भारत उदय अभियान राबविण्यात आला. रविवारी राष्ट्रीय पंचायत दिनाचे औचित्य साधून अभियानाची सांगता करण्यात आली.