अवैध व्यापार संकुल बांधकाम;अभियंत्यावर गुन्हा नोंदवा

0
9

आमगाव : आमगाव ग्रामपंचायत अंतर्गत असलेल्या शासनाच्या झुडपी जंगल या भूमीवर जिल्हा परिषदेने अनधिकृतपणे मंजुरी देऊन अवैध व्यापार संकुल बांधकाम प्रारंभ केला.या बांधकामविरूध्द नागरिकांनी शासनापर्यंत तक्रार केली. तर सदर प्रकरण न्यायालयात दाखल करण्यात आले.परंतु या प्रक्रियेला बांधकाम जि.प. अभियंत्याने लाथ मारण्याचा प्रयत्न करून बांधकामाला मुजोरशाहीने सुरू ठेवला. सदर बांधकाम बंद करण्याचे तहसीलदार यांच्या आदेशालाही केराची टोपली दाखविली. त्यामुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे.
जिल्हा परिषद गोंदिया येथील पदाधिकारी व प्रशासकीय अधिकारी स्वत:चे हित जपण्यासाठी आमगाव येथे वनविभाग व महसूल विभागांतर्गत येणार्‍या झुडपी जंगल गट क्रं. २३५, २३५ या जागेवर अनधिकृत मान्यता प्रदान करून व्यापारी संकुल बांधकाम प्रारंभ केला.
या बांधकामविरूध्द नागरिकांनी जिल्हाधिकारी, मुख्य कार्यपालन जि.प. गोंदिया तसेच शासनाकडे लिखित तक्रार केली. नागरिकांनी १७ फेब्रुवारी २0१६ ला केलेल्या तक्रारीवर जिल्हाधिकारी यांनी संबंधित विभागांना सूचना करून योग्य कार्यवाहीचा अहवाल मागितला.
तहसीलदार आमगाव यांनी जिल्हाधिकारी यांच्या संदर्भीय पत्राप्रमाणे, सार्वजनिक बांधकाम विभाग जिल्हा परिषद उपविभाग आमगाव यांना अनधिकृत बांधकाम बंद करून अहवाल मागितला. परंतु ५एप्रिल २0१६ ला पत्र क्रं. (कालि/प्रस्तु-१/कावि ६१५/२0१६) च्या पत्राची दखल न घेता जिल्हा परिषद बांधकाम विभागाच्या अभियंत्याने दुजोरा दिला नाही.तर नागरिकांनी दाखल केलेल्या उच्च न्यायालय खंडपीठ नागपूर येथील जनहित याचिका न्यायप्रविष्ठ असल्याने बांधकाम बंद करण्याच्या निवेदनालाही संबंधित विभागाने गांभीर्याने घेतले नाही.