कोच्छीसाठी 100 तर, खिंडसीसाठी 160 कोटी – जलसंपदा मंत्र्यांची घोषणा

0
8

नागपूर : जिल्ह्याची पाण्याची तहान भागविण्यासाठी सावनेर तालुक्यातील कोच्छी प्रकल्पाला शंभर कोटी रुपये जुलैमध्ये उपलब्ध करुन देण्यात येतील, असे आश्वासन जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी दिले. तसेच निधीअभावी राज्यातील कोणतेच अपूर्ण असलेले प्रकल्पाचे काम थांबणार नाही, असेही त्यांनी सांगितले.

कोच्छी बॅरेज प्रकल्पाची आज जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी पाहणी केली. त्यांच्यासोबत या दौऱ्यात पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, आमदार सुनील केदार, डॉ. राजीव पोतदार, अशोक धोटे, सोनबा मुसळे, रमेश मानकर, देविदास मदनकर आदी उपस्थित होते.

पैशामुळे, विविध अडचणींमुळे या प्रकल्पाचे काम रखडले असून 262 कोटींचा प्रकल्प 700 कोटींचा झाला आहे. आणखी 300 कोटी रुपयांची या प्रकल्पाला आवश्यकता असून पुनर्वसनाच्या दृष्टीने व काम सुरु करण्यासाठी शंभर कोटी रुपये जुलैमध्ये उपलब्ध करुन देण्यात येतील, असे सांगताना ते म्हणाले, राज्यातील महत्त्वाचे असलेले प्रकल्प यानंतर निधीसाठी थांबणार नाही. तीन वर्षात शक्य ते सर्व प्रकल्प पूर्ण करुन शेतकऱ्यांना न्याय देऊ. पैशाची काळजी नको, कामे रेंगाळतील अशी स्थिती येणार नसल्याचे ते म्हणाले.

कोच्छी बॅरेज या महत्त्वपूर्ण प्रकल्पाला मध्यप्रदेश शासनाने सहकार्य मिळाले आहे, असे सांगताना पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले. आर्थिक वर्षात म्हणजे 31 मार्चला 160 कोटी रुपये या प्रकल्पासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यामुळे उपलब्ध झाले. गोसीखुर्द, पेंच, कोच्छी हे सर्व प्रकल्प आता पूर्ण होणार आहे. यापुढे आता पैशा अभावी जिल्ह्यातील कोणताच प्रकल्पाचे काम थांबणार नाही. तसेच या प्रकल्पात जमीन गेलेल्या शेतकऱ्यांना पुनर्वसनासाठी लवकरच आपण बैठक घेऊन समस्या निकाली काढू.