चार आश्रमशाळांची मान्यता कायमची रद्द

0
13

चिमूर-एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयाच्या कार्यक्षेत्रांतर्गत येत असलेल्या चार अनुदानीत आश्रमशाळांची कायमस्वरूपी मान्यता आयुक्तांनी नाकारली आहे. मान्यता रद्द करण्यात आलेल्या आश्रम शाळांमध्ये विद्यार्थ्यांसाठी मूलभूत सुविधांसह अनेक त्रुटी असल्याने त्यांची मान्यता कायमची नाकारण्यात आल्याने शिक्षण क्षेत्रात खळबळ उडाली आहे.
मान्यता रद्द करण्यात आलेल्या आश्रम शाळांमध्ये अनुदानित आश्रमशाळा गोंदेडा, अनुदानित आश्रमशाळा गरडापार दोन्ही आश्रम शाळा चिमूर तालुक्यातील असून अनुदानित आश्रमशाळा कवडशी (बोर) व अनुदानित आश्रमशाळा सुर्ला या वरोरा तालुक्यातील दोन आश्रमशाळांचा समावेश आहे. या आश्रम शाळांची यापूर्वी विद्यार्थ्यांना पुरविण्यात येणार्‍या सुविधांबाबत चौकशी झाली होती. यात चारही आश्रम शाळांमध्ये विद्यार्थ्यांची पटसंख्या कमी, सुविधांचा अभाव व विविध समस्या आढळून आल्या.
त्यामुळे नाशिक येथील आदिवासी विभागाचे आयुक्त यांच्यासमोर आश्रम शाळांची मान्यता नाकारण्याबाबत सुनावणी झाली. यात चारही आश्रम शाळांची मान्यता नाकारण्यात आली आहे.
आयुक्तालयाने तसे आदेश काढले असून या आदेशान्वये चारही आश्रम शाळांची कायमस्वरूपी मान्यता रद्द करण्यात आली आहे. त्यामुळे पालकांनी संबंधित आश्रम शाळेत आपल्या पाल्यांचा प्रवेश करू नये. सदर शाळेत विद्यार्थी प्रवेशित केल्यास व विद्यार्थ्यांचे नुकसान झाल्यास सर्वस्वी जबाबदारी पालकांची राहील, असे चिमूर एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाचे प्रकल्प अधिकारी जितेंद्र एन. चौधरी यांनी कळविले आहे.