बाळ-बाळंतिणीचा मृत्यू, रुग्णालयाची तोडफोड

0
9

अमरावती : बाळबाळंतीणीच्या मृत्यूनंतर बुधवारी सकाळी ६ वाजताच्या सुमारास मृतांच्या नातेवाईकांसह महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या काही कार्यकर्त्यांनी स्वस्तीक नगरातील एका खासगी रुग्णालयाची तोडफोड केली. डॉक्टर वासंती कडू यांनी उपचारात हयगय केल्यामुळेच महिलेचा मृत्यू झाल्याचा आरोप त्यांनी केला. यासंदर्भात नातेवाईकांनी राजापेठ पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली आहे.
वडरपूरा येथील रहिवासी राजश्री नरेश ठाकूर (२७) यांना प्रसूती वेदना होत असल्याने मंगळवारी दुपारी स्वस्तिक नगरातील वासंती कडू यांच्या रूग्णालयात नेण्यात आले होते. तेथे डॉक्टरांनी तपासणी करून औषधोपचार सुरु केले. मात्र, राजश्री यांची गंभीर प्रकृती बघून डॉक्टरांनी त्यांना जिल्हा स्त्री रुग्णालयात हलविण्याचा सल्ला नातेवाईकांना दिला. त्यानंतर तिला डफरीन रूग्णालयात हलविण्यात आले. तेथील डॉक्टरांनी राजश्री यांची तपासणी केली असता त्यांच्या पोटातील बाळ दगावल्याचेलक्षात आले. पोटातून मृत बाळ काढण्याची प्रक्रिया सुरू असतानाच रात्री १२ वाजताच्या सुमारास राजश्री हिचाही मृत्यू झाला. त्यामुळे संतप्त नातेवाईकांनी राजश्रीच्या मृत्यूसाठी प्रसूतितज्ज्ञ वासंती कडू यांनाच कारणीभूत ठरवित संताप व्यक्त केला.

घटनेची माहिती महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उपशहराध्यक्ष संजय गवारे यांना मिळताच त्यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी मंगळवारी रात्रीच राजापेठ पोलीस ठाणे गाठून वासंती कडू यांच्याविरुध्द तक्रार नोंदविण्याचा प्रयत्न केला. मात्र, चौकशीअंती कारवाई करण्याची भूमिका पोलिसांनी घेतली. त्यामुळे बुधवारी सकाळी मृताच्या नातेवाईकांसह मनसेच्या काही कार्यकर्त्यांनी प्रसूतीतज्ज्ञ वासंती कडू यांच्या रूग्णालयाची तोडफोड सुरु केली. कार्यकर्ते व नातेवाईकांनी डॉक्टरांची एम.एच. २७ एच.-२८0 क्रमांकाचे वाहन, त्यांचा कक्ष, ओटी रुम, लेबर रूमची तोडफोड केली.