अर्जुनी मोरगाव विधानसभा क्षेत्राचा सर्वांगीण विकास साधण्याचा प्रयत्न :– आमदार मनोहर चंद्रिकापुरे

0
12

 =बाकटी- सानगडी व सिलेझरी येथे रस्ता बांधकामाचे भूमिपूजन 
अर्जुनी मोर. ( सुरेंद्रकुमार ठवरे )- अर्जुनी मोरगाव विधानसभा क्षेत्रातील संपूर्ण रस्ते गुडगुडीत व्हावे म्हणून आपण मोठ्या प्रमाणात निधी आणून प्रत्येक गावातील अंतर्गत रस्ते असो किंवा मुख्य रस्त्यांना जोडणारी रस्ते मजबूत बनविण्याचा प्रयत्न करीत आहोत. या सोबतच शेतकऱ्यांना सिंचनाच्या बाबतीत असो किंवा अन्य प्रश्न किंवा योजना असो किंवा धार्मिक स्थळांचा विकास असो तो साधण्याचा आपण प्रयत्न केला.गावाचा विकास करण्यासाठी सबंधित ग्रामपंचायतीच्या सरपंचांनी विकासाचा वार्षिक आराखडा तयार करून तो पंचायत समिती, जिल्हा परिषद सोबत आमदाराकडे द्यावा आणि लोकप्रतिनिधीच्या समन्वयातूनच प्रत्येक गावाचा विकास साधावा, मग्रारोहयोच्या माध्यमातूनही गावात अनेक विकासाची कामे प्रस्तावित केली जातात. ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांनी कसून मेहनत घेतली तर गावाचा विकास दूर नाही. सिलेझरी, बाकटी परिसरातील गावाच्या विकासासाठी आपण लाखो रुपयांचा निधी देऊन विकास कामे केली आहेत. नरेगाच्या माध्यमातूनही प्रत्येक गावात वर्सासाठी एक ते दीड कोटी ची कामे व्हावी असा आराखडा तयार करा असे  आमदार चंद्रिकापुरे म्हणाले. बोंडगाव देवी जिल्हा परिषद क्षेत्रातील अनेक गावात सिंचनाची समस्या आहे. नवेगाव बांध जलाशयाच्या माध्यमातून पाणी कसे देता येईल याचा नियोजन सुरू आहे .आपण अर्जुनी मोरगाव विधानसभा क्षेत्राच्या सर्वांगीण विकास साधण्याचा प्रयत्न करू असे आश्वासन आमदार मनोहरराव चंद्रिकापुरे यांनी दिले.
अर्जुनी मोरगाव तालुक्यातील शिलेझरी- बाकटी या अंतर्गत रस्त्यासाठी मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेअंतर्गत एक कोटी 72 लाख रुपयाचे सिमेंट रस्ता तथा बाकटी- सानगडी या डांबरीकरण रस्त्यासाठी तीन कोटी 52 लाख रुपये निधीचा रस्ता मंजूर करण्यात आला असून त्या रस्ता बांधकामाच्या भूमिपूजन प्रसंगी तारीख 28 सप्टेंबर आमदार मनोहर चंद्रिकापुरे बोलत होते. यावेळी जिल्हा परिषद सदस्य रचनाताई गहाणे ,जिल्हा परिषद सदस्य लायकराम भेंडारकर, राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष लोकपाल गहाणे, शिलेझरीचे सरपंच सुखदेव मेंढे ,कंत्राटदार विनोद नाकाडे ,माजी सरपंच सुनीता ब्राह्मणकर ,सोमलपूरच्या सरपंच भूमिकाताई ढोक, बाकटी च्या सरपंच सरिता राजगिरे, गुडरीचे सरपंच विवेक डोंगरे, पुरुषोत्तम नंदेश्वर, पिसाराम गणवीर ,तथा चारही गावातील उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, विविध पदाधिकारी व ग्रामवासी प्रामुख्याने उपस्थित होते. यावेळी जिल्हा परिषद सदस्य रचनाताई गहाणे व लायकराम भेंडारकर यांनीही या परिसरात सतत भेडसावणारी सिंचनाच्या संदर्भात नवेगाव बांध जलाशयाचे पाणी या परिसरात पोहोचविण्यासाठी करण्यात येत असलेले प्रयत्न यावर मार्गदर्शन केले. तर या क्षेत्रात नागरिकांना भेडसावणाऱ्या विविध समस्या याबाबत आमदार महोदयांना अवगत केल्या व आम्ही या क्षेत्राच्या विकासासाठी कटिबद्ध असल्याचे सांगितले, प्रास्ताविक सरपंच सुखदेव मेंढे यांनी तर संचालन उमराव शहारे यांनी केले. यावेळी परिसरातील चार पाच गावचे नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.