कोरोना काळात मृत्यूशी झुंज देत यूपीएससी पास,आदित्य जीवने यांच्यावर नक्षलग्रस्त गडचिरोलीची जबाबदारी

0
12

गडचिरोली:-राज्य सरकारने शुक्रवारी राज्यातील ९ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या. यापैकी ७ अधिकाऱ्यांची सहाय्यक जिल्हाधिकारी म्हणून तर २ अधिकाऱ्यांची सह- सहाय्यक जिल्हाधिकारी म्हणून राज्यातील विविध जिल्ह्यांमधील उपविभागात नियुक्ती करण्यात आली आहे. महत्त्वाचं म्हणजे संबंधित अधिकाऱ्यांचे फेज-|| प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर या नियुक्त्या अथवा बदल्या करण्यात आल्या आहेत. यात कोरोना काळात मृत्यूशी झुंज देत यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण करणाऱ्या आयएएस आदित्य जीवने यांना अतिदुर्गम व नक्षलग्रस्त गडचिरोलीची जबाबदारी देण्यात आली आहे. सहाय्यक जिल्हाधिकारी तथा प्रकल्प अधिकारी म्हणून त्यांची भामरागडला नियुक्ती झाली आहे.

चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा येथील रहिवासी असलेल्या आदित्य चंद्रभान जीवने यांनी सेंट एनिस कॉन्व्हेंट येथून २०११ मध्ये दहावी परीक्षा ९२ टक्के गुणांनी उत्तीर्ण केली. तेव्हा ते वरोरा तालुक्यातून प्रथम आले होते. त्यानंतर नागपूर येथे नारायणा विद्यालयातून सीबीएससी मध्ये बारावीची परीक्षा पास केली. यशवंतराव चव्हाण अभियांत्रिकी महाविद्यालय, नागपूर येथून मेकॅनिकल इंजिनिअर विषयात पदवी प्राप्त केली. तिथून थेट केंद्रीय लोकसेवा आयोगाची परीक्षा देण्यासाठी दिल्ली गाठली. पहिल्या प्रयत्नात परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर मुलाखतीत अपयश आले. मात्र या अपयशाने खचून न जाता आदित्यने पुन्हा नव्या दमाने आयएएसची तयारी सुरू केली. दुसऱ्या प्रयत्नात ३९९ व्या रँकने उत्तीर्ण झाले. मात्र त्यासाठी त्यांना आयुष्याची सर्वात मोठी परीक्षा द्यावी लागली. केंद्रीय लोकसेवा आयोगाची परीक्षा दिल्यानंतर त्यांना कोरोनाची लागण झाली. देशात सर्वत्र करोनाचा हाहाकार असताना आदित्य रूग्णालयात मृत्यूशी झुंज देत होते. त्यांना उपचारार्थ दाखल केले होते. त्यांचा स्कोअर १८ असताना डॉक्टरांनी त्यांना जीवदान दिले. या काळात मृत्यूशी दोन हात करण्याची हिंमत त्याने केली.

आदित्य जीवने यांनी प्रशिक्षण कालावधीत बीड जिल्ह्यात पटोद्याचे उपविभागीय अधिकारी, नंतर बीड तहसीलदार, बीड पंचायत समितीचे गटविकास अधिकारी, माजलगाव नगरपालिकेचे सीओ पदाची सूत्रे सांभाळली आहेत. माजलगावमध्ये अतिक्रमण हटाव मोहीम राबवून अतिक्रमण धारकांवर मोठ्या प्रमाणात कारवाई केलेली आहे. तर बीड तहसीलदार व पटोदा उपविभागीय अधिकारी असताना वाळू माफियांवर कारवाई करून त्यांचे कंबरडे मोडलेले आहे. बीड पंचायत समितीचे गटविकास अधिकारी म्हणून त्यांनी उत्कृष्ट कार्य केले. बीड जिल्ह्यात प्रशिक्षणार्थी जिल्हाधिकारी म्हणून आदित्य जीवने यांची डॅशिंग अधिकारी म्हणून ओळख आहे. आता त्यांची शासनाने सहाय्यक जिल्हाधिकारी तथा प्रकल्प अधिकारी भामरागड म्हणून नियुक्ती केली आहे.

भामरागडचे तत्कालीन प्रकल्प अधिकारी शुभम गुप्ता यांची सिईओ म्हणून पदोन्नती झाल्यावर येथील प्रभार सहाय्यक प्रकल्प अधिकारी रोषणा चव्हाण यांनी सांभाळली आहे.आता मूळचे वरोरा येथील आदित्य जीवने जबाबदारी सांभाळणार आहे. विशेष म्हणजे भामरागड प्रकल्प कार्यालय अंतर्गत भामरागड आणि एटापल्ली या दोन तालुक्यात शासकीय आणि अनुदानित आश्रम शाळा असून ही दोन्ही अति संवेदनशील आणि नक्षलग्रस्त म्हणून ओळखले जाते.