- पुणे,दि.3- प्रत्येकाच्या घरी शौचालय आवश्यक असल्याचे सरकारने स्पष्ट करीत लोकप्रतिनिधींनाही ते बंधनकारक केले आहे.तसेही घरात शौचालय असण्याचे अनेक फायदे आहेत. मात्र शौचालय नसल्याने एखाद्याचे केवढे नुकसान होऊ शकते हे पुणे जिल्ह्यातील माण गावात दिसून आले.चक्क सरपंचाला घरात शौचालय नसल्यामुळे आपल्या खुर्चीवरुन पायउतार व्हावे लागले असून सरपंच सुध्दा या महिला आहेत. आयएसओचा दर्जा असलेल्या आणि विकासाचं परिपूर्ण मॉडेल म्हणून गौरवलेल्या माण ग्रामपंचायतीच्या सरपंचांकडे शौचालय नसल्याने अपात्रतेची कारवाई करण्यात आली आहे. स्मिता भोसले असे सरपंचाचं नाव आहे. निवडणुकीच्या वेळी घरात शौचालय नसतानाही, शौचालय असल्याची दिलेली माहिती स्मिता भोसले यांना महागात पडली आहे.या प्रकरणात ग्रामसेवकावरही कारवाई झाली.
2015 च्या ऑगस्टमध्ये झालेल्या निवडणुकीपूर्वी जुलैमध्ये सरपंचपदाच्या उमेदवार स्मिता भोसले यांनी घरात शौचालय असल्याचा पुरावा दिला होता. मात्र सरपंचपदावर विराजमान झाल्यानंतर 22 सप्टेंबर 2015 रोजी स्मिता यांचे पती सागर भोसले यांनी शौचालयाच्या अनुदानासाठी ग्रामपंचायतीकडे अर्ज केला.खुर्चीचा वापर करून ही केलेली चतुराई यशस्वी झाली असे वाटत असतानाच, त्यांचा हा डाव विरोधी पक्षाचे सदस्य राजेंद्र भोसले यांनी हाणून पाडला. त्यांच्या तक्रारीनंतर भोसलेंवर अपात्रतेची कारवाई करण्यात आली आहे.