काटोल तालुक्यातील विविध विकासकामांचे उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते भूमिपूजन

0
4

नागपूर, दि. 7 पाणंद रस्त्यांच्या दुरुस्तीची शेतकऱ्यांची सर्वात जास्त मागणी असते. यासाठी 70 कोटी रुपयांचा निधी यंदा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. येत्या तीन वर्षात जिल्ह्यातील सर्व पाणंद रस्त्यांची कामे पूर्ण करण्यात येणार असल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

काटोल तालुक्यातील पट्टे वाटप व विविध विकासकामांचे भूमिपूजन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी आ. चंद्रशेखर बावनकुळे, आ. अनिल देशमुख, माजी आ. सुधाकर कोहळे, माजी आ. आशिष देशमुख, जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, स्थानिक लोकप्रतिनिधी यावेळी उपस्थित होते.  उपमुख्यमंत्री पुढे म्हणाले की, शेतकऱ्यांसाठी पाणंद रस्ता हा सोईचा असतो. शेतामध्ये या रस्त्याच्या माध्यमातून ये- जा होत असते. त्यामुळे या रस्त्यांच्या दुरुस्तीला प्राधान्य देण्यात येणार आहे. यासोबतच मोदी आवास घरकुल योजनेअंतर्गत जिल्ह्यासाठी यंदा 30 हजार घरांचे लक्ष्य निश्चित करण्यात आले आहे . पात्र सर्व लाभार्थ्यांना घरकुल देण्यात येणार आहे. जिल्ह्याच्या विकासासाठी निधी कमी पडू देणार नसल्याचे उपमुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.

काटोल ही नगरपालिका जिल्ह्यातील प्रमुख नगरपालिकापैकी आहे. काटोल शहर आणि तालुक्यासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देण्यात येईल, असे उपमुख्यमंत्री पुढे म्हणाले.

नागपूर जिल्ह्यासाठीही जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून १२०० कोटी रुपयांपर्यंत निधी उपलब्ध करून देण्यात येत आहे. जिल्ह्यासाठी अधिकाधिक निधी उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न आहे.काटोल तालुक्यातीलही सर्व महत्त्वाच्या रस्त्यांसाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देणार आहे. स्थानिक एमआयडीसीतील पायाभूत विकास कामांना सुरुवात करण्यात येणार आहे. जिल्ह्यात दवाखाना आपल्या घरी हा अभिनव उपक्रम सुरू करण्यात आला आहे . गावोगावी हा उपक्रम पोहोचविण्याचा प्रयत्न असल्याचे उपमुख्यमंत्री म्हणाले.

गरीब आणि सर्वसामान्य नागरिकांना पट्टे वाटप होत असल्याचे समाधान आहे. वेळोवेळी पट्टे वाटपाचा आढावा घेत शासन स्तरावरील त्रुटी दूर करण्यात आल्या. पट्टे वाटप करताना पक्के घर किंवा कच्चे असा कुठलाही फरक न करता पट्टे वाटप करावे, असे निर्देशही यावेळी त्यांनी प्रशासनाला दिले.

दरम्यान, उपमुख्यमंत्री महोदयांच्या हस्ते काटोल तालुक्यातील प्रातिनिधिक स्वरूपात पाच लाभार्थ्यांना पट्टे वाटप करण्यात आले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक काटोल मुख्याधिकारी धनंजय बोरीकर यांनी केले. तर आभार कैलाश खंते यांनी मानले.

बँकेच्या ग्राहक सेवांचे लोकार्पण

काटोल येथील अरविंद सहकारी बँक लि.च्या विशेष ग्राहक सेवांचे लोकार्पण उपमुख्यमंत्री महोदयांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी बँकेचे अध्यक्ष माजी आमदार आशीष देशमुख यांच्यासह बँकेचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

संत तुकाराम महाराज सांस्कृतिक सभागृहाचे भूमिपूजन

काटोल तालुक्यातील डोंगरगाव येथील जगदगुरु श्री संत तुकाराम महाराज सांस्कृतिक सभागृह व कौशल्य विकास केंद्राचे  भूमिपूजन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले.  खासदार कृपाल तुमाने, आ. चंद्रशेखर बावनकुळे, अनिल देशमुख, सुनील केदार, माजी मंत्री परिणय फुके, आशिष देशमुख, केशवराव डेहनकर, बबनराव तायवाडे आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.