देवरी,दि.२४- येथून १० किलोमीटर अंतरावर असलेल्या मुल्ला येथे सरपंच कल्पना बागडे यांच्या संकल्पनेतून विद्यार्थ्यांनी उन्हाळ्यात पक्ष्यांसाठी पाण्याची सोय व्हावी म्हणून गावातील झाडांवर पाणपोई लावण्याचा अभिनव उपक्रम आज दि.२४ रोजी राबविण्यात आला.
उन्हाळ्याच्या दिवसात जंगलातील जलसाठा कमी होतो. परिणामी, जंगलात वावरणारे प्राणी यांना पाण्यासाठी वणवण भटकावे लागते. अशातच पक्षी यांची तर फारच दमछाक होते. नेमकी हीच बाब हेरली ती मुल्ला गावच्या प्रथम नागरिक कल्पना बागडे यांनी. पाण्यावाचून कोणत्याही पक्ष्याचा जीव जावू नये, याची खबरदारी घेवून ग्रामपंचायत मुल्लाच्या पुढाकारातून गावातील अधिकाधिक झाडांवर पाणपोई लावण्याचे उपक्रम राबविले. या कार्यात सरपंच यांचेसह गावातील सर्व पदाधिकारी, शालेय विद्यार्थी आणि ग्रामपंचायतीच्या माध्यमातून संगणक चालविण्याचे मोफत प्रशिक्षण घेत असलेले विद्यार्थी यांनी विशेष सहकार्य केले.