काम केले कंत्राटदाराने, पैसे उचलले सरपंच आणि सचिवाने!

0
7

गडचिरोली/कुरखेडा,दि.२१: गडचिरोली जिल्ह्यातील कुरखेडा येथे वाढीव पाईपलाईनच्या काम केल्याच्या मोबदल्यात संबंधित कंत्राटदारास जादा रक्कम दिल्याचे दाखवून प्रत्यक्षात सरपंच व ग्रामसेवकाने ६ लाख ८४ हजार ३९ रुपयाच्या रकमेचा धनादेश परस्पर बँकेतून वठवून घेतल्याचा आरोप भाजप पदाधिकाऱ्यांनी आज(दि.21) पत्रकार परिषदेत केला.
पत्रकार परिषदेला भाजपचे तालुकाध्यक्ष राम लांजेवार, जिल्हा सचिव विलास गावंडे, भाजपचे शहराध्यक्ष तथा नगरपंचायतीचे गटनेते रवींद्र गोटेफोडे, भाजप महिला आघाडी प्रमुख तथा नगरसेविका नंदिनी दखणे, नगरसेविका स्वाती नंदनवार, दीपाली देशमुख उपस्थित होते.
पत्रकार परिषदेत माहिती देताना भाजपचे तालुकाध्यक्ष राम लांजेवार यांनी सांगितले की, कुरखेडा येथील श्रीरामनगरातील पाण्याच्या टाकीपासून ते विहिरीपर्यंत वाढीव पाइपलाईनचे काम गोंदिया येथील अनिलकुमार दुबे यांना देण्यात आले होते. कुरखेडा ग्रामपंचायतीच्या ग्राम आरोग्य पोषण आहार पाणीपुरवठा व स्वच्छता समितीच्या अंदाजपत्रकीय तरतुदीनुसार हे काम देण्यात आले. १३ मार्च २०१२ च्या सभेत संबंधित काम उन्हाळयात व पावसाळयापूर्वी पूर्ण करावे, असे कंत्राटदार दुबे यांना कराराद्वारे सांगण्यात आले. या कामाची अंदाजपत्रकीय किमत ३६ लाख २९१ रुपये एवढी होती. हे काम पूर्ण करावयाची मुदत २१ ऑक्टोबर २०१० पर्यंत ठरविण्यात आली. त्यानुसार कामाला सुरुवातही झाली. परंतु सहा महिने कालावधीचे काम नानाविध कारणांनी आजतागायत सुरुच आहे. या कामाची नोंद अंतिम मोजमाप पुस्तिकेत होणेही बाकी आहे. मात्र पाणीपुरवठा विभागाचे उपविभागीय अभियंता व त्यांच्या अधिनस्त अभियंत्याने मोजमाप पुस्तिकेतील पृष्ठ क्रमांक १ ते ३१ नुसार कंत्राटदार दुबे यांना २४ लाख २३ हजार ३०६ रुपये द्यावे, असे नमूद केले होते. परंतु तत्कालिन सरपंच व सचिवाने संबंधित कंत्राटदारास ३१ लाख ४ हजार ३४५ रुपये एवढी रक्कम दिल्याचे दिसून येत आहे. यातील ६ लाख ८४ हजार ३९ रुपये एवढ्या रकमेचा धनादेश(क्र.६०५१६६) संबंधित कंत्राटदाराच्या नावाने काऊंटर स्लीप नोंदवून तत्कालिन सरपंच व सचिवाने परस्पर विड्राल केला, असा आरोप राम लांजेवार यांनी पत्रकार परिषदेत केला.
पाइपलाईनचे काम बी-१ पद्धतीचे कंत्राट असल्याने कंत्राटदारास धनादेश देताना तो रेखांकित(अकाउंट पेयी) असावा, असा नियम आहे. मात्र तत्कालिन सरपंच व सचिवाने पदाचा गैरवापर करुन रकमेचा अपहार केला, असा आरोप राम लांजेवार, विलास गावंडे, रवींद्र गोटेफोडे यांनी केला.
विशेष म्हणजे राज्य शासनाने २३ एप्रिल २०१५ रोजी तालुकास्तरावरील ग्रामपंचायतींना नगरपंचायतीचा दर्जा देण्याची घोषणा केल्यानंतर २४ एप्रिलला २०१५ रोजी कुरखेडा नगर परिषद अस्तित्वात आली आणि तहसीलदारांकडे प्रशासकपदाचा कार्यभार सोपविण्यात आला. याच संधीचा फायदा घेत तत्कालिन सरपंच व ग्रामविकास अधिकाऱ्याने कंत्राटदाराच्या नावे काउंटरस्लीप नोंदवून रकमेची उचल केली. परंतु आधी वितरीत केलेल्या प्रमाण काउंटर स्लीपवर कंत्राटदाराची स्वाक्षरी घेतली नाही व तो धनादेश स्वत:च्या नावे ३ जुलै २०१५ रोजी बँकेत वठविला. या संपूर्ण प्रकाराची चौकशी करुन दोषीवर कारवाई करावी, अशी मागणी राम लांजेवार व उपस्थितांनी पत्रकार परिषदेत केला.