१६ वर्षीय मुलीचे बालविवाह थांबविण्यात दामिनी पथकाला यश

0
14

गोंदिया,दि.२९ः तालुक्यातील गोंदिया ग्रामीण पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या एका गावात १६ वर्षीय मुलीचे बालविवाह होत असल्याची माहिती मिळताच दामिनी पथकाने सदर स्थळ गाठून मुलींच्या पालकांची समजूत काढत २८ एप्रिल रोजी होणारा बालविवाह रोखण्यात दामिनी पथक आणि गोंदिया ग्रामीण पोलिसांना यश आले आहे.

पोलीस अधिक्षक निखील पिंगळे, अप्पर पोलीस अधीक्षक नित्यानंद झा, यांचे निर्देश, मार्गदर्शनाखाली महिला, मुली, शाळकरी बालके, विशेषतः मुली, युवती यांचे सुरक्षितता संबंधाने रात्र- दिवस गस्त पेट्रोलिंग व्दारे गोंदिया जिल्हास्तरावर दामिनी पथक कार्य करीत आहे.त्याचप्रमाणे कायद्याचे ज्ञान नसल्याने,अडाणीपणामुळे लहान मुले- मुली यांचे बालविवाहाचे आयोजन करून बालविवाह करणाऱ्याचे मनपरिवर्तन, समुपदेशन करून बालविवाह रोखण्याचे उल्लेखनीय कार्यसुध्दा दामिनी पथकाद्वारे केले जात आहे.दामिनी पथक जिल्ह्यात पेट्रोलिंगद्वारे कार्य करीत असताना दामिनी पथक आणि पो. स्टे. गोंदिया ग्रामिण पोलिसांना हद्दीतील एका गावामध्ये एका अल्पवयीन मुलीचे बालविवाह 28/04/2024 रोजी नियोजीत केल्याची माहिती मिळाली.सदर माहितीच्या अनुषंगाने संबधीत गावाचे पोलीस पाटील यांचेसह मुलीच्या घरी पथक पोहोचले. त्यावेळी ज्या मुलीचे लग्न ठरले होते ती मुलगी व तीची आई घरी हजर होती.अंगणात लग्नाचे मंडप आच्छादलेले होते.व लग्नाची संपुर्ण तयारी केल्याचे दिसून आले.मुलीची व तिच्या आईची योग्य ती चौकशी केली असता संबधीत मुलीने नुकतीच 9 व्या वर्गाची परीक्षा दिली असून तिचे शैक्षणिक कागदपत्रांची तपासणी केली असता त्या मुलीचे वय अवघे 16 वर्षे असल्याचे निदर्शनात आले.मुलगी अल्पवयीन असल्याचे निष्पन्न झाल्याने मुलीची व तिच्या आई व नातेवाईक यांचे कायदा, आणि बालविवाह या बाबतीत समुपदेशन करून सदर नियोजीत विवाह रद्द करण्यात आला आहे.

सदरची कामगिरी पो.ठाणे गोंदिया ग्रामीण चे सहा.पोलीस निरीक्षक श्री.वर्मा, पो.उप.नि. मट्टामी, दामिनी पथकातील मपोउपनि भावना राऊत, पोशि- राजेंद्र अंबादे, रमेंद्र बावनकर, मपोशि पुनम मंजुटे, भांदक्कर, चालक मपोशि- रंगारी,आणि पो. स्टे.गोंदिया ग्रामिण चे पोलीस हवा. मरहस्कोल्हे, इंद्रजित भुते, पो.शि. नागदेवे, मपोशि- शेंद्रे , गणविर तसेच बालविवाह मुक्त भारत अभियान चे ज्ञानेश्वर पटले, विशाल मेश्राम, पुजा डोंगरे, सुमित गोंडाणे यांनी संयुक्तपणे कार्यवाही करून नियोजीत बालविवाह रोखण्यात यश प्राप्त केले.