एकोडीवासियांनी केला देशी दारु दुकानाचा विरोध

0
17

एकोडी(दांडेगाव)दि.30 :गोंदिया तालुक्यातील सर्वात मोठे आणि महत्वाचे गाव म्हणून एकोडीची ओळख आहे.या ठिकाणी प्राथमिक आरोग्य केंद्रापासून सर्वच शासकीय विभागांची कार्यालये आहेत हेच हेरुन याठिकाणी दारु दुकान सुरु करण्याचा प्रयत्न करण्यात आले असता येथील नवीन देशी दारूदुकानास परवाना देण्यात येवू नये, या मागणीचे सरपंच रवी पटले,ग्रा.प.सदस्य अजाबराव रिनायत यांच्यासह महिला बचत गटाच्या सदस्यांनी सरपंचाच्या नेतृत्वात जिल्हाधिकारी व उत्पादन शुल्क अधिकार्यांना निवेदन दिले.
मागील दोन ते तीन वर्षांपासून एकोडी येथे रितेश जायस्वाल रा.मुरदाडा यांनी आपल्या खासगी जागेत घर बांधले. नंतर तयार करण्यात आलेल्या त्याच घरात देशी दारूच्या चिल्लर विक्रीचे दुकान सुरू करण्याकरिता ग्रामपंचायतला ना हरकत प्रमाणपत्र मिळण्याबाबत अर्ज केले होते. त्यानुसार जयस्वाल यांनी ७ मे २0१५ च्या तहकूब ग्रामसभेच्या ठराव-१ नुसार नाहरकत प्रमाणपत्र देण्यात आले होते.
परंतु ग्रामपंचायतच्या जुलै २0१५ च्या निवडणुकीत नवीन सरपंच यांच्या आयोजित प्रथम ग्रामसभेत १५ ऑगस्ट २0१५ ला दिलेला ७ मे २0१५च्या तहकूब ग्रामसभेचा ठराव १५ऑगस्ट २0१५ च्या ग्रामसभेत विषय-२ नुसार सर्वानुमते नामंजूर करण्यात आला. परंतु या नवीन उघडण्यात येणार्‍या देशी दारू चिल्लर विक्री दुकानास गावातील महिलांचा मोठय़ा प्रमाणात विरोध असून या प्रकरणाबाबत काही काही महिन्यांच्या अंतराने दारुबंदी राज्य उत्पादन शुल्क गोंदिया यांचे काही कर्मचारी एकोडी येथे येवून स्थानिक लोकांकडून देशी दारू दुकानासंबंधात न बोलता चौकशी करून जातात, असे अनेक लोकांकडून सांगण्यात येते. तसेच वरिष्ठ अधिकार्‍यांकडे गावाच्या बाबतीत चुकीचा अहवाल सादर करुन खरी माहिती लपविण्याचा प्रकार होत आहे.
निवेदनात, महिला बचत गट व इतर महिलांचा मोठय़ा प्रमाणात विरोध असून हे दुकान राज्य महामार्ग-२४९ ला लागून ३0 फूट अंतरावर तयार करण्यात आलेल्या घरात सुरू करण्याबाबत जयस्वाल यांच्याकडून कार्यवाही सुरू आहे.परंतु अशाप्रकारचे नियमबाह्य काम सुरू करण्यास विरोध असून जवळच अनेक लोकांची घरे आहे. त्यामुळे त्यांना मोठय़ा प्रमाणात त्रास सहन करावा लागणार आहे.गावात जी शांतता व सुव्यवस्था नांदत आहे त्याला छेद पडण्याचा धोका महिलांनी व्यक्त केला आहे. या दुकानामुळे गावात असलेल्या दारूड्यांची संख्या मोठय़ा प्रमाणात वाढेल. जर देशी दारूचिल्लर विक्री दुकानास परवाना दिल्यास महिला, पंचायत समिती सदस्य, सरपंच आणि नागरिकांकडून मोठे आंदोलन करुन विरोध करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे.