मुसळधार पावसामुळे भामरागडचा तुटला संपर्क

0
7

गडचिरोली,दि.01-गडचिरोली जिल्ह्याच्या दक्षिण भागात गेल्या 24 तासापासून पडत असलेल्या पावसाचा फटका भामरागड, मुलचेरा व अहेरी तालुक्याला बसला आहे. भामरागडजवळून वाहणार्या पर्लकोटा नदीला पूर आल्याने तालुक्याचा इतर भागाशी संपर्क तुटला असून गुरवारी रात्रीपासून भामरागड तालुक्यात वीज पुरवठा खंडित झाला आहे.
मुसळधार पाऊस आणि लगतच्या छत्तीसगड राज्यात झालेल्या पावसामुळे पर्लकोटा नदीला पूर आला आहे. त्यामुळे भामरागड तालुक्याला जोडणारा पर्लकोटा नदीवरील मोठा पुल पाण्यात बुडाल्याने भामरागड तालुक्याचा संपर्क तुटला आहे. दरम्यान पर्लकोटा नदीचे पाणी भामरागड गावात शिरले असून प्रशासनाने नागरीकांना सुरक्षित स्थळी जाण्याच्या सुचना केल्या आहेत. दरम्यान भामरागडचा वीज पुरवठा रात्रीपासून बंद पडला असून मोबाईल सेवाही पुर्णपणे बंद पडली आहे. जिल्हाधिकारी नायक यांनी आपत्ती व्यवस्थापनाच्या पथकाला भामरागडकडे रवाना केले आहे.