महिला डॉक्टरवरील अत्याचाराचे पडसाद, निवासी डाॅक्टरांचा संप सुरूच

0
130

गोंदिया, ता. १६ ःकोलकाता येथील महिला डॉक्टरवरील अत्याचाराचे पडसाद राज्यभरासह उमटत आहेत. दरम्यान, या घटनेच्या निषेधार्थ येथील वैद्यकीय महाविद्यालय, रुग्णालय व बाई गंगाबाई महिला रुग्णालयात कार्यरत निवासी डॉक्टरांनी १३ आॅगस्टपासून बेमुदत संप पुकारला आहे. शुक्रवारी (ता. १६) तिव्र निदर्शने करीत निवासी डाॅक्टरांनी न्याय देण्याची मागणी केली.
कोलकाता येथील सरकारी रुग्णालयात कार्यरत एका महिला डॉक्टरवर अत्याचार करून तिची हत्या केल्याची घटना नुकतीच घडली. या घटनेने संपूर्ण देश हादरला आहे. दरम्यान, या घटनेच्या निषेधार्थ राज्यातील वैद्यकीय महाविद्यालयांतील निवासी डॉक्टरांनी १३ ऑगस्टपासून बेमुदत संप पुकारला आहे. डॉक्टरांची संघटना मार्डने या संपाला समर्थन देत सपांत सहभागी झाले आहे. कोलकाता अत्याचार व हत्या प्रकरणाचा केंद्रीय यंत्रणेकडून निष्पक्ष आणि पारदर्शक तपास करावा, आरोपींना अटक करून कठोर शिक्षा द्यावी, अशी मागणी निवासी डॉक्टरांनी केली आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, रुग्णालय, बाई गंगाबाई महिला रुग्णालयात कार्यरत निवासी डाॅक्टर मोठ्या संख्येने संपात सहभागी झाले आहेत.