चिचगड-ककोडी मार्गाची दुरवस्था

0
10

फोटो- चिचगड-ककोडी महामार्गावर चिचगडनजीक पडलेला जीवघेणा खड्डा. (छाया- सुरेश भदाडे)

गोंदिया- देवरी तालुक्यातील चिचगड-ककोडी या २० किलोमीटर राज्यमार्गाची जडवाहतुकीमुळे अत्यंत दुरवस्था झाली आहे. परिणामी, पावसाळ्याच्या दिवसात नागरिकांना कमालीचा त्रास सहन करावा लागत आहे.
सविस्तर असे की, देवरी तालुक्यातील चिचगड- ककोडी हा राज्यमार्ग अत्यंत महत्वाचा मार्ग आहे. याच मार्गाने लगतच्या छत्तीसगड राज्याशी संपर्क जोडला जातो. राष्ट्रीय महामार्ग क्र. ६ वरून होणारी जड वाहतूक अनेक कारणांनी या मार्गावरून वळती होत असते. यात प्रामुख्याने चोरट्या वाहतुकीचा अंतर्भाव असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. अनेकवेळा या वाहतुकीवर निर्बंध लावण्याची मागणी प्रशासनाकडे करण्यात आली आहे. परंतु, थातुरमातूर कारवाईनंतर पुन्हा ही चोरटी वाहतूक बिनदिक्कत सुरू होते. या मार्गावरून क्षमतेपेक्षा अधिक वजनाचे वाहन जात असल्याने जागोजागी रस्त्याची दुरवस्था झाली आहे. अनेक ठिकाणी तर मोठे खड्डे पडल्याने वाहनधारकांचा जीव धोक्यात आला आहे. सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने फुटलेला रस्ता आणि पडलेले खड्डे यामुळे वाहनचालकांना कमालीचा त्रास सहन करावा लागत आहे.
दरम्यान, नागरिकांनी दिलेल्या माहितीनुसार रात्रीचे वेळी तर जडवाहनचालक रस्ता देत नसल्याने आणि जमीन ओली झाल्याने दुचाकीचालकांना जीवघेणा प्रवास करावा लागत आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाचे या रस्त्याच्या डागडुजीकडे दुर्लक्ष आहे. तरी या रस्त्याची झालेली दुरवस्था त्वरित दूर करण्याची मागणी चिचगड-ककोडी परिसरातील नागरिकांनी केली आहे.