आ.विजय रहांगडाले :मोफत गॅस योजनेचा लाभ घ्या

0
8

तिरोडा : प्रधानमंत्र्यांनी श्रीमंतांना गॅस अनुदान सोडण्याच्या आवाहनावरून एक कोटी १३ लाख लोकांनी अनुदान सोडले. या वाचलेल्या अनुदानातून देशात पाच कोटी कुटुंबांना मोफत गॅस देण्याच्या निर्णयाची अंमलबजावणी सुरू झालेली असून दारिद्रय़ रेषेखालील कुटुंबानी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन आ. विजय रहांगडाले यांनी केले आहे.
परिसरातील गॅस एजन्सीकडे यादी व फार्म नि:शुल्क उपलब्ध आहेत. फक्त गॅस शेगडी व सिलेंडर रिफिलिंग रक्कम पोटी एक हजार ७00रुपये भरावयाचे आहेत. अर्जदाराच्या कुटुंबातील फक्त महिला सदस्यांच्याच नावाने अर्ज करावयाचे आहे. वयाची अट १८ वर्षांवरील असून एजन्सीकडे ज्यांची नावे शासनाकडून उपलब्ध आहेत अशा लाभार्थ्यांनी अर्ज करावयाचे आहेत.ज्यांच्याकडे १ हजार ७00 रुपये नाहीत, त्यांनी जवळच्या गॅस एजन्सी मालकाकडे कर्ज फार्म भरता येईल, अशी व्यवस्था केली आहे.
जवळ भरावयाचे पैसे नसतील तरी शासनाने कर्जाची सोय केली असल्याने त्याची किस्त सबसीडीमधून कापली जाईल किंवा आपल्याला भरता येईल. काही राजकीय दलाल या योजनेतून गरिबांचे आर्थिक शोषण करण्याच्या प्रयत्नात असल्याचे निदर्शनास आले आहे. गरिबांनी या योजनेचा लाभ घेताना दलालांना बळी न पडता गावागावातील भाजप कार्यकर्त्यांची मदत घेवून या योजनेचा फायदा घ्यावा, असे आवाहन आ. विजय रहांगडाले यांनी केले आहे.