इंदूमिल स्मारकसह,राज्यातील विविध महापुरुषांच्या स्मारकाचे कार्य लवकर पूर्ण व्हावे

0
74

अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी माजी मंत्री, आमदार राजकुमार बडोले यांनी विविध विषयांवर वेधले सदनाचे लक्ष

गोंदिया,दि.२२ः- महाराष्ट्र विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी राज्याचे माजी मंत्री आणि अर्जुनी मोरगाव विधानसभेचे आमदार राजकुमार बडोले यांनी राज्यातील, गोंदिया जिल्ह्यातील तसेच अर्जुनी मोरगाव विधानसभा क्षेत्रातील विविध विषयांवर विधानसभेचे लक्ष वेधले. संपूर्ण हिवाळी अधिवेशनात माजी मंत्री राजकुमार बडोले अत्यंत सक्रिय दिसले. प्रत्येक दिवशी त्यांनी विविध विषयांना हात घालत शासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला.

२०१४-१९ मधे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस सरकारने इंदू मिल येथे भव्य स्मारक करण्याचा निर्णय घेतला होता. स्टेचू ऑफ लिबर्टी पेक्षा देखील उंच डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा तेथे थाटात उभा राहणार असून देशाला प्रेरणा देणार आहे. इंदू मिल स्मारक लवकरात लवकर पूर्ण व्हावे, सोबतच परमपूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या स्थळांचा विकास जसे दीक्षाभूमी, चिंचोली सोबतच विविध महापुरुषांच्या स्मारकाचा विकास करणे ज्यात लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, वस्ताद लहुजी साळवे, महात्मा जोतिबा फुले, सावित्रीबाई फुले स्मारकाचा समावेश आहे ही कामे तातडीने पूर्ण करण्याची मागणी राजकुमार बडोले यांनी केली.

विविध समाजाच्या महामंडळांना जास्तीस जास्त निधी उपलब्ध करून दिला जावा

महाराष्ट्र राज्यातील बहुजन समाजातील अनुसूचित जाती, जमाती, ओबीसी आणि इतर समाजासाठी जे महामंडळ स्थापन करण्यात आले आहेत त्या महामंडळाना मागील काळात निधी देण्यात आला होता, यंदा सुद्धा जास्तीत जास्त निधी कसा देता येईल आणि त्या मार्फत समाजाचे कसे भले होईल यावर लक्ष देण्याची गरज असल्याचे माजी मंत्री आणि आमदार राजकुमार बडोले यांनी बोलून दाखवले आणि विविध समाजाच्या महामंडळांना जास्तीस जास्त निधी उपलब्ध करून दिला जावा अशी मागणी विधीमंडळात केली.

धापेवाडाटप्पा ३ उपसा सिंचन योजनेला निधी द्या आणि झाशीनगर उपसा सिंचन च्या अडचणी दूर करा

गोंदिया भंडारा जिल्ह्याला वरदान ठरलेल्या धापेवाडा उपसा सिंचन योजनेच्या तिसऱ्या टप्प्याची प्रशासकीय मान्यता शासनाने केली मात्र निधी उपलब्ध होऊ शकला नाही. सदर निधी उपलब्ध शासनाने करून दिला पाहिजे तसेच अर्जुनी मोरगाव विधानसभा क्षेत्रात झाशीनगर उपसा सिंचन योजना मुळे ३५०० हेक्टर शेतजमिनीला लाभ होणार असून सदर प्रकल्पाच्या अडचणी दूर करू लवकर प्रकल्प सुरू करून कार्यान्वित करण्याची विनंती माजी मंत्री आणि आमदार राजकुमार बडोले यांनी नागपूर हिवाळी अधिवेशनात उचलून धरली.

धानाला २५ हजार रुपये बोनस द्यावा आणि प्रोत्साहन राशीचे तात्काळ वाटप करावे

गोंदिया जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात धान खरेदी करण्यात येते मात्र प्रत्येक वेळी बारदाना चा प्रश्न उभा राहतो. धान खरेदी प्रक्रिया सुरळीत व्हाव्ही म्हणून बारदाना उपलब्ध करुन देण्याची मागणी राजकुमार बडोले यांनी केली. सोबतच धानाला २५ हजार रुपये बोनस देण्यात यावा तसेच नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकरी बांधवाना ५० हजार रुपये प्रोत्साहन राशी देण्यात यावी अशी मागणी देखील केली.

राजकुमार बडोले यांनी जिल्ह्यातील इतर प्रश्नांकडे कडे देखील वेधले लक्ष

माजी मंत्री आणि आमदार राजकुमार बडोले यांनी इटियाडोह, नवेगावबांध जलाशय आणि इतर ठिकाणी मासेमारी करणाऱ्या मच्छीमारांच्या समस्या मांडत त्यांचा लीज चा कालावधी वाढवण्याची मागणी उचलून धरली. याचसोबत गोंदिया जिल्हा मधील झाडीपट्टी मधे प्रमुख ठिकाणी नाट्यगृह निर्माण करणे आणि गोंदिया जिल्ह्यातील काही गावांमधील बंद असलेली प्रादेशिक पाणी पुरवठा योजना परत सुरु करण्याची मागणी माजी मंत्री आणि आमदार राजकुमार बडोले यांनी विधानसभेत केली.