१९ तास गडचिरोलीकर राहिले अंधारात

0
7

गडचिरोली : शहरानजीक असलेल्या कोटगल वीज उपकेंद्रातील ट्रॉन्सफॉर्मरमध्ये बिघाड निर्माण झाल्याने संपूर्ण गडचिरोली शहर, गडचिरोली तालुका व धानोरा तालुक्याच्या रांगी परिसराचा वीज पुरवठा बुधवारी रात्री ९ वाजता खंडित झाला. संपूर्ण रात्र व गुरूवारी दिवसभर विद्युत पुरवठा खंडित असल्याने नागरिकांचे हाल झाले.

कोटगल येथील वीज उपकेंद्रातून गडचिरोली शहर, गडचिरोली तालुक्यातील बहुतांश गावे व धानोरा तालुक्यातील रांगी परिसराला वीज पुरवठा केला जातो. बुधवारच्या रात्री या उपकेंद्रातील ट्रॉन्सफॉर्मरमध्ये बिघाड निर्माण झाला. विद्युत कर्मचाऱ्यांनी सदर बिघाड दुरूस्त करण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याला यश आले नाही. त्यामुळे रात्री १.३० वाजता आरमोरीवरून विद्युत पुरवठा घेऊन कॉम्प्लेक्स परिसरात वीज पुरवठा पूर्ववत करण्यात आला. त्यानंतर गुरूवारी सकाळी ६.३० वाजेपासून कॉम्प्लेक्स परिसरात विद्युत पुरवठा खंडित करून सदर वीज गडचिरोली शहराच्या इतर भागांना देण्यात आली. मात्र गडचिरोली शहराचा लोड जास्त असल्याने ही लाईनसुद्धा ब्रेकडाऊन झाली. त्यानंतर दुपारी १२ वाजेपासून व्याहाडवरून वीज पुरवठा घेण्यात आला. मात्र गडचिरोली शहराचा लोड सांभाळत नसल्याने दुपारी दीड वाजता व्याहाडवरून येणारा वीज पुरवठा सुद्धा खंडित झाला. रात्री १० वाजेपासून वीज विभागाच्या कर्मचाऱ्यांनी कोटगल येथील ट्रॉन्सफॉर्मरमधील बिघाड शोधून तो दुरूस्त करण्याचा प्रयत्न केला. मात्र यश आले नाही. त्यामुळे त्या ठिकाणी गुरूवारी नवीन ट्रॉन्सफॉर्मर लावण्यात आले. नवीन ट्रॉन्सफॉर्मर लावण्याची प्रक्रिया आटोपल्यानंतर वीज पुरवठा गुरूवारी दुपारी ४.२० वाजता पूर्ववत झाला