कन्हान नगर परिषदेच्या उपाध्यक्षांविरुद्ध गुन्हा दाखल

0
12

नागपूर, दि. २६ : सफाई कंत्राटदाराकडून एक लाखाची लाच मागितल्याप्रकरणी कन्हान नगर परिषदेचे उपाध्यक्ष डॉ. मनोहर पाठक यांच्याविरुद्ध लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गुन्हा दाखल केला. या घडामोडीमुळे राजकीय वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली आहे.

कन्हान शहरातील घानकचरा उचलणे आणि साफसफाई करण्याचे कंत्राट २०१५ मध्ये खलिद अंसारी यांना मिळाले होते. त्यांचे थकित बील काढून देण्याच्या बदल्यात नगर परिषदेचे उपाध्यक्ष डॉ. पाठक यांनी एक लाखाची लाच मागितली होती.

अंसारी यांनी तशी तक्रार गेल्यावर्षी एसीबीकडे नोंदवली होती. तत्कालीन अधिका-यांनी सापळा रचून ९ आॅक्टोबर २०१५ ला सायंकाळी कन्हानच्या जयस्तंभ चौकात लाचेची रक्कम स्विकारताना डॉ. पाठक यांना पकडले होते. शहरातील भाजपाचे वजनदार प्रस्थ अशी ओळख असलेल्या पाठक यांनी त्यावेळी एसीबीच्या वरिष्ठांना आपली बाजू सांगून कारवाईचे बालंट टाळले होते.

त्यामुळे अंसारी यांनी कोर्टात धाव घेतली. कोर्टाने दिलेल्या आदेशानुसार, सोमवारी रात्री एसीबीने पाठक यांच्याविरुद्ध लाचलुचपत प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल केला. या घडामोडीमुळे जिल्ह्यातील राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. वृत्त लिहिस्तोवर डॉ. पाठक यांना अटक झालेली नव्हती.