नगर पंचायतचा उपक्रम : कचराकुंडी व घंटागाडीचे लोकार्पण

0
17

तक्रारीसाठी ‘टोल फ्री’ क्रमांक

शहर स्वच्छतेसाठी घेतला पुढाकार

गोरेगाव,दि.21 : शहराला स्वच्छ व निरोगी ठेवण्याच्या उद्देशातून नगर पंचायतने पुढाकार घेत शहरात कचराकुंडी व घंटागाडीची व्यवस्था केली आहे. स्वातंत्र्यदिनाचे निमित्त साधून शहरात १00 कचराकुंडी व ८ घंटागाड्यांचे लोकार्पण नगराध्यक्ष सीमा कटरे,उपाध्यक्ष आशिष बारेवार,बांधकाम सभापती टेभुर्णकीकर, नगरसेवक मलेश्याम येरोला,रुस्तम येळे,चन्ने, यांच्यासह सर्व पदाधिकारी यांच्या उपस्थितीत करण्यात आले.
आज प्रत्येकच शहरात कचर्‍याची समस्या स्थानिक प्रशासनासाठी डोकेदुखीची ठरत आहे. यापासून सुटका व्हावी व शहर स्वच्छ तसेच सुंदर रहावे यासाठी नगर परिषदेने शहरात कचराकुंडी व घंटागाडी उपक्रम राबविण्याचे ठरविले.
या कचराकुंड्यांमुळे कचरा इतरत्र फेकण्याच्या प्रकारावर आळा बसणार आहे. तसेच एकत्र झालेला कचरा जवळील ग्राम हलबीटोला येथील घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पात पाठविला जाणार आहे.
यासाठी प्रकल्प पुन्हा सुरू करण्याचे कार्य नगर पंचायतकडून केले जात आहे. कचराकुंडी व घंटागाडीच्या या उपक्रमाला काही शहरवासीयांनी विरोध दर्शविला होता. मात्र यावर उपाध्यक्ष व आरोग्य सभापती आशिष बारेवार यांनी टोल फ्री क्रमांकाचा तोडगा काढला आहे. यातंर्गत कचराकुंड्यांतील कचरा नियमीत उचलला जाणार आहे. मात्र यात खंड पडल्यास शहरवासीयांना त्याबाबत नगर पंचायतच्या टोल फ्री क्रमांकावर तक्रार नोंदविता येणार आहे. यासाठी कुचराकुंड्यांना क्रमांक दिले जाणार असून त्यावर नगर पंचायतचा टोल फ्री क्रमांकही नोंदविला जाणार आहे.