गोंदिया,दि.२८ः दक्षता जनजागृती सप्ताहानिमित्त लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या निर्देशाप्रमाणे गोंदिया लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या वतीने सदर कालावधीत दक्षता जनजागृती सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे.त्यानिमित्ताने भ्रष्टाचार निर्मूलनाची प्रतिज्ञा सर्व अधिकारी व कर्मचारी यांना देण्यात आली. तसेच राज्यपाल आचार्य देवव्रत व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संदेशांचे उपस्थितांसमोर वाचन करण्यात आले.
देशाच्या आर्थिक, सामाजिक तथा राजकीय प्रगतीमध्ये भ्रष्टाचार हा एक मोठा अडथळा असून सर्व कामे प्रामाणिकपणे करण्याची प्रतिज्ञा यावेळी उपस्थितांनी घेतली. तसेच दक्षता जनजागृती सप्ताहानिमित्त पाठविलेल्या संदेशात राज्यपालांनी नागरिकांचा सक्रिय सहभाग, प्रामाणिक आचरण आणि पारदर्शक प्रशासन याबरोबरच सामूहिक प्रयत्नांद्वारे आपण विकसित भारत 2047 कडे वाटचाल करतो आहे असे सांगितले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेल्या भ्रष्टाचारमक्त भारत संकल्पनेला वास्तवात आणण्यासाठी ही जनजागृती मोहिम अत्यंत महत्वपूर्ण आहे. दक्षता जनजागृती सप्ताहाच्या माध्यमातून आपण सर्वांनी भ्रष्टाचाराविरोधी भूमिका घेत, प्रामाणिकता आणि पारदर्शक कारभारातून विकसित भारताच्या निर्मितीत आपले योगदान द्यावे, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या संदेशाव्दारे केले आहे,त्या संदेशाचे वाचन करण्यात आले.
राज्यात दरवर्षी ‘दक्षता जनजागृती सप्ताह’ आयोजित करण्यात येतो. यावर्षी 27ऑक्टोबर ते 2 नोव्हेंबर 2025 या कालावधीत दक्षता जनजागृती सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. यावर्षी ‘दक्षता: आपली सामायिक जबाबदारी ’ ही संकल्पना घेऊन हा सप्ताह साजरा केला जाणार आहे.
सदर दक्षता जनजागृती सप्ताहाच्या अनुषंगाने भ्रष्टाचारी विरोधी जनजागृती संदर्भातील फ्लेक्स तसेच गोंदिया शहरातील प्रमुख शासकीय कार्यालयाच्या आवारात दर्शनी भागावर भ्रष्टाचार विरोधी जनजागृती संदर्भातील भित्तीपत्रके व बॅनर्स लावण्यात येणार आहेत.नागरिकांना भ्रष्टाचार विरोधी जनजागृती संदर्भातील पत्रके वाटून त्यांना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या कार्यप्रणाली बाबत मार्गदर्शन करण्यात येणार आहे.भ्रष्टाचार निर्मूलन करण्यासाठी प्रत्येक शासकीय कार्यालयात लाच घेणे अथवा लाच देणे गुन्हा असे बोर्ड आवश्यक असून लाचलुचपत प्रतिबंधक विभाग कार्यालयाचा पत्ता व फोन नंबर टोल फ्री नंबर लिहिणे आवश्यक आहे,अशा सूचना शासकीय कार्यालयांना दिले आहेत.





