वसतिगृहातील समस्यांना वाचा फोडण्यासाठी विद्यार्थ्यांचे ठिय्या आंदोलन

0
19

गोंदिया- एकात्मिक आदिवासी विभागाच्या वतीने गोंदिया येथे सुरू असलेल्या चारही वसतिगृहातील अनागोंदी कारभाराविरुद्ध स्थानिक वसतिगृह क्र.२ समोर काल पासून विद्याथ्र्यांनी ठिय्या आंदोलनाला सुरवात केली आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आंदोलनस्थळी येऊन समस्यांचे निराकरण करावे, अशी भूमिका आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांनी घेतल्याने प्रशासनाचे चांगलेच धाबे दणाणले आहे.
सविस्तर असे की, देवरीच्या एकात्मिक आदिवासी प्रकल्प कार्यालयाच्या मार्फत गोंदिया येथे चार वसतिगृह सुरू आहेत. परंतु, या वसतिगृहात वास्तव्यास असलेल्या आदिवासी विद्यार्थ्यांना कोणत्याही भौतिक सुविधा पुरविल्या जात नसल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केला आहे. येथील वसतिगृह क्र. २ मध्ये एकूण ८० विद्यार्थी क्षमता असताना आदिवासी विद्यार्थ्यांना येथे प्रवेशापासून वंचित ठेवण्यात आले. या वसतिगृहात ६ खोल्या आणि केवळ एका स्वच्छतागृहाची सोय आहे. परिणामी, आपल्या दैनंदिन क्रिया आटोपण्यासाठी विद्यार्थ्यांना उघड्यावर जावे लागते. झोपण्यासाठी पुरेशी व्यवस्था नसल्याने विद्यार्थ्यांना खाली झोपावे लागते. याशिवाय वसतिगृह अस्वच्छतेने कळस गाठला असून विद्याथ्र्यांचे आरोग्य धोक्यात आले आहे.
शैक्षणिक सत्राची सुरवात होऊन २ महिन्याचा कालावधी लोटला तरी प्रशासनाने अद्यापही शैक्षणिक साहित्याचे वाटप केले नाही. परिणामी, विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. वॉर्डन व सफाई कर्मचाऱ्यांकडून विद्यार्थ्यांचाा छळ केला जात असल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केला आहे. या कर्मचाऱ्यांचे स्थानांतरण करणे, प्रतीक्षा यादीतील विद्याथ्र्यांना वसतिगृहात प्रवेश देणे, नवीन वसतिगृह सुरू करणे या विषयी वरिष्ठ अधिकाऱ्यांना वारंवार विनंती करूनही विद्यार्थ्य्याच्या मागणीकडे सातत्याने दुर्लक्ष होत असल्याचे विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे. परिणामी, आंदोलनाचा पर्याय विद्यार्थ्यांनी निवडल्याचे आंदोलनकर्त्यांनी सांगितले.

समस्यांचे निराकरण केले जाईल- पी. एम. खंडारे

विद्यार्थ्यांच्या आंदोलनाची माहिती मिळताच देवरीचे एकात्मिक आदिवासी प्रकल्प कार्यालयाचे प्रकल्प अधिकारी पी. एम. खंडारे यांनी आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांची घटनास्थळी जाऊन विचारपूस केली. त्यांच्या मागण्या रास्त असल्याचे सांगत श्री खंडारे यांनी या समस्यांचे लवकरच निराकरण करण्याचा प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन विद्यार्थ्यांना दिले. येत्या १५ सप्टेंबर पूर्वी विद्यार्थ्यांची प्रवेशप्रक्रिया पूर्ण करणार असल्याचेही त्यांनी सांगितले