कृषीसेवक सरळ सेवा पदभरती परीक्षेच्या निकालात घोळ

0
18

सीआयडी चौकशी करण्याची काँग्रेसची मागणी


भंडारा, (दि.१०) -कृषीसेवक सरळ सेवा पदभरती परीक्षेच्या निकालात राज्यातील सर्वच विभागात मोठ्याप्रमाणात घोळ झाल्याचे लक्षात येते. त्याचप्रमाणे भंडारा जिल्ह्यातील विद्यार्थ्यांवर सुद्धा अन्याय झाल्याचे लक्षात येते. राज्यात कृषी सेवकांच्या ७३० पदांसाठी परीक्षा ६ ऑगस्ट २०१६ रोजी घेण्यात आली. सदर परीक्षेत ६५ हजारावर विद्यार्थ्यांनी  दाखल केले होते. त्यापैकी ५७ हजार विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली या परीक्षेचा निकाल ६ सप्टेंबर २०१६ रोजी जाहीर करण्यात आला.
परंतु, सदर निवड प्रक्रियेमध्ये पुढीलप्रमाणे घोळ आढळून आलेत. विशाल उखा पाटील (अर्ज क्रमांक १३६६४, बैठक क्रमांक ५१२७१४६३९६) हा विद्यार्थी औरंगाबाद विभागातून OBC प्रवर्गातून १८२ गुण प्राप्त करीत ह्याची निवड ओपन जनरल – १३ मध्ये झाली. हाच विद्यार्थी ठाणे विभागातुन (अर्ज क्रमांक ४८१७, बैठक क्रमांक १५२११०९०२०) OBC प्रवर्गातून १८२ गुण प्राप्त करीत ह्याची निवड ओपन जनरल – ९ मध्ये झाली.  पुणे विभागातून हरीश कैलास देवरे व नरेश कैलास देवरे  भाऊ उत्तीर्ण झाले. या दोन्ही भावांना १८३ गुण प्राप्त झाले. विशेष म्हणजे या दोन भावांच्या वयात केवळ ६ महिन्याचे अंतर आहे. औरंगाबाद विभागात प्रथम क्रमांकाच्या विद्यार्थ्याला १८७ गुण त्याखालोखाल १८४ गुण प्राप्त केलेले पाच विद्यार्थी, १८३ गुण प्राप्त केलेले सहा विद्यार्थी,१८२ गुण प्राप्त केलेले तीन विद्यार्थी व त्यानंतर थेट १३७ गुण प्राप्त केलेला परीक्षार्थी. कोल्हापूर विभागात प्रथम क्रमांकाच्या विद्यार्थ्याला १८२ गुण त्याखालोखाल १८१ गुण प्राप्त केलेले चार विद्यार्थी व त्यानंतर थेट १५० गुण प्राप्त केलेला परीक्षार्थी.
अमरावती विभागात सर्वसाधारण गटात फक्त १२४ गुणांवर प्रथम क्रमांकाचा विद्यार्थी आहे. नागपूर विभागात १६५ ते १८२ गुणांच्या दरम्यान १६ मुले आहेत व १४८ ते १६२ गुणांच्या दरम्यान एकही उमेदवार नाही व नंतर थेट १४८ गुणांच्या खाली इतर परीक्षार्थी आहेत. मेरिट लिस्ट व प्रतीक्षा यादीतील गुणांमध्ये मोठी तफावत आहे. निवड यादीत ओपन प्रवर्गातील पुरुष निवड यादी ९२ गुणांवर तसेच महिला निवड यादी ९१ गुणांवर झाली. यांच्या तुलनेत OBC महिला यादी ११३ व OBC पुरुष यादी १२९ गुणांवर अंतिम निवड करण्यात आली. OBC उमेदवारांना जास्त गुण असूनसुद्धा डावलण्यात आल्याचे स्पष्ट होते व ओपन प्रवर्गातील विद्यार्थ्यांची निवड कमी गुणांवर सुद्धा करण्यात आली. सर्वसाधारण गटात गुणवत्ता यादीत १८६ गुणांचा विद्यार्थी पहिला आला आहे परंतु प्रश्न पत्रिकेचे अवघड स्वरूप बघता मेरिटचे आकडे संशयास्पद आहेत. करीता सदर विद्यार्थ्यांची परीक्षाकेंद्रावरील व्हिडिओ रेकॉर्डिंग तपासण्यात यावी जेणेकरून कुणी यांना मदत तर करीत  किंवा अत्याधुनिक उपकरणाचे वापर तर करीत नाहीत तसेच सादर प्रकरणाची CID चौकशी करण्यात यावी व त्यात भंडारा जिल्ह्यातील विद्यार्थ्यांचे मत सुद्धा नोंदविण्यात यावे अशी मागणी नगरसेवक महेंद्र निंबार्ते, शमीम शेख, धर्मेंद्र गणवीर, पृथ्वी तांडेकर, नगर अध्यक्ष सचिन घनमारे, डॉ. विनोद भोयर, प्रसन्न चकोले, अजय गडकरी, मनोज बागडे,  इम्रान पटेल, दिलीप देशमुख, कोमल कळंबे, मुकुंद साखरकर, मोहीस कुरेशी, पराग भुतांगे, शीतल भुरे, राहुल शामकुवर,सतीश वैरागडे, गीता रेहपाडे, यांनी केली.