वंचित समाजाच्या कल्याणासाठी शासन कटिबध्द- राजकुमार बडोले

0
12

विमुक्त भटक्या जमातीला जात प्रमाणपत्राचे वाटप
विविध महामंडळाचा घेतला आढावा
भंडारा,berartimes.com दि. २० :- भटक्या विमुक्त तसेच वंचित समाजाच्या कल्याणासाठी शासनाने विविध योजना सुरु केल्या असून या योजनांच्या माध्यमातून वंचित समाजाला विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी शासन कटिबध्द असल्याचे प्रतिपादन राज्याचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री राजकुमार बडोले यांनी केले.
महाराजस्व अभियानांतर्गत मांग गारोडी, गोपाळ, वडार व इतर अनुसूचित जाती जमातीचे प्रमाणपत्र वाटपाचा कार्यक्रम सामाजिक न्याय भवन येथे आयोजित करण्यात आला, त्यावेळी ना. बडोले बोलत होते. या वेळी उपविभागीय अधिकारी डॉ. संपत खिलारी, समाज कल्याणचे सहाय्यक आयुक्त देवसूदन धारगावे, तहसिलदार संजय पवार, भटक्या विमुक्त समाज परिषदेचे शिवा कांबळे, राहुल चव्हाण, अंकुश तांदूळकर, उकंडजी वडस्कर व दिलीप चित्रिव उपस्थित होते. यावेळी मान्यवरांच्या हस्ते जात प्रमाणपत्रांचे वाटप करण्यात आले. या कार्यक्रमात सामाजिक न्याय विभाग भंडारा यांच्या वतीने तयार करण्यात आलेल्या कॉफीटेबल बुकचे प्रकाशन ना.बडोले यांच्या हस्ते करण्यात आले.
सामाजिक न्याय विभागाच्या विविध योजनांचा लाभ घेवून आपल्या विकासास चालना दयावी. समाजाची परिस्थिती जर सुधारावयाची असेल शिक्षण घेणे महत्वाचे आहे. या समाजाने शिक्षणास प्राधान्य देवून आपले जीवन सुकर करावे, असे ते म्हणाले. भटक्या विमुक्तांना समाजाने आपले म्हणावे, असे आवाहन करुन ना. बडोले म्हणाले की, सर्वांना जात प्रमाणपत्र देण्यासाठी पाठपूरावा केला जाणार आहे. मांग गारुडी समाजाला अनुसूचित जातीच्या योजनांचा लाभ देण्याच्या सूचना त्यांनी केल्या.
यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजनेंतर्गत भंडारा जिल्हयात जागा मिळण्यासाठी व मांग गारुडी समाजाला स्वत:ची वसाहत मिळण्यासाठी नियोजन करण्याच्या सूचना त्यांनी जिल्हा प्रशासनाला केल्या. शासनाच्या विविध योजना व विकासात भटक्या विमुक्तांना अग्रक्रम तसेच प्राधान्य देण्यात यावेत, असे ते म्हणाले. जात प्रमाणपत्र मिळालेल्यांमध्ये विद्यार्थी असल्यास त्यांनी शिक्षण घ्यावे व समाजाला पुढे न्यावे, असे ते म्हणाले. दहावी झालेल्या विद्यार्थ्यांना रोजगार देण्यासाठी प्रयत्न केला जाईल, असेही त्यांनी सांगितले. या समाजातील महिलांना बचत गटाच्या माध्यमातून रोजगार देण्यासाठी पुढाकार घेतला जाईल, असे आश्वासन ना. बडोले यांनी दिले.
ना. बडोले पुढे म्हणाले, आज जात प्रमाणपत्र वाटपाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. त्यात ज्यांना प्रमाणपत्र मिळाले नाही त्यांनी नाराज व्हायचे कारण नाही. प्रमाणपत्राबाबत शासकीय स्तरावर काही त्रुटी असल्यास त्याबाबत जिल्हाधिकारी व ग्रामस्तरावर बैठक घेवून तोडगा काढण्यात येईल. लवकरच त्यांनाही दाखले देण्यात येतील. असेही ते म्हणाले. या समाजाने शिक्षणाला प्रथम प्राधान्य दयावे तरच समाजाचा उध्दार होईल, असेही ते म्हणाले. कार्यक्रमाचे प्रस्ताविक उपविभागीय अधिकारी डॉ. संपत खिलारी यांनी केले तर संचालन व आभार तहसिलदार संजय पवार यांनी मानले.
या कार्यक्रमांनंतर सहाय्यक आयुक्त यांच्या कक्षात ना. बडोले यांनी विविध महामंडळाची आढावा बैठक घेतली. विमुक्त भटक्या ज माती महामंडळाने थेट कर्जाचे २५ प्रकरण करण्याचे निर्देश त्यांनी दिले. अण्णाभाऊ साठे महामंडळाअंतर्गत मांग गारुडी समाजाचे थेट कर्जाचे जास्तीत जास्त प्रकरण करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या या सोबतच महात्मा फुले महामंडळ, अपंग महामंडळ व मिटकॉम यांनी सुध्दा जास्तीत जास्त प्रकरण करावे, असे निर्देश त्यांनी या बैठकीत दिले.