युनिव्हर्सल फेरो कारखाना सुरूहोण्याचा मार्ग मोकळा

0
8

तुमसर : तुमसरजवळील युनिव्हर्सल फेरो कारखान्याचा वीज दराचा गुंता सुटला असून राज्य शासनाने औद्योगिक वीज ४ रूपये ४0 पैसे युनिट दराने देण्याची घोषणा केली. यामुळे युनिव्हर्सल कारखाना सुरूहोण्याच्या मार्ग मोकळा झाला आहे. राज्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई, कंपनीचे संचालक फिरोज नेत्रावाला व शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र पटले यांची मुंबईत बैठक झाली. या बैठकीत विदर्भ तथा मराठवाड्यातील आजारी उद्योगांसाठी अत्यल्प वीज दर लागू करण्यात आले आहे.
युनिव्हर्सल फेरो मॅग्नीज शुद्ध करणारा कारखाना सन २00६ पासून कायम बंद आहे. या कारखान्यावर सुमारे २00 कोटी वीज बिल थकीत होते. अभय योजनेअंतर्गत कंपनी व्यवस्थापनाने ४६ कोटी रूपये भरले होते. शासनाने येथे १२८ कोटी माफ केले. मार्च २0१७ पर्यंत हा कारखाना सुरू करण्याची अट घातली होती. शिवसेनेचे जिल्हाप्रमुख राजेंद्र पटले यांच्या नेतृत्वात आंदोलन करण्यात आले होते.
राज्य शासनाने २६ टक्के वीज दर कमी केले. राजेंद्र पटले यांनी उद्योगमंत्री सुभाष देसाई, कंपनीच्या मुख्य कार्यकारी अधिकार्‍यांशी कारखाना सुरू करण्यासंदर्भात चर्चा केली होती. शासनावर दबाव येत असल्याने ४.४0 प्रति युनिट सरसकट वीज आकारणी करण्याची घोषणा केली. कंपनी मालक फिरोज नेत्रावाला यांनी १00 टक्के कारखाना सुरू करण्याची हमी दिली.
येथील कामगारांची याचिका न्यायालयात प्रलंबित आहे. कामगारांची ही न्याय मागणी रास्त आहे. कामगार संघटनेचे अध्यक्ष तथा वकील एस.डी. ठाकूर यांनी कारखाना सुरू करण्याकरीता अडचण नाही, असे राजेंद्र पटले यांना सांगितले. ही बाब कंपनी व्यवस्थापनाने मान्य केली. या बाबींचा विचार करता युनिव्हर्सल कारखाना सुरू करण्याकरिता कोणतीही अडचण नाही.