जिल्ह्यात नवोदय विद्यालय सुरू करा

0
15

साकोली,दि.25: भंडारा जिल्ह्यात नवोदय विद्यालय तात्काळ सुरू करण्यात यावे, अशी मागणी साकोलीवासीयांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना तहसिलदारामार्फत दिलेल्या निवेदनातून केली निवेदन दिले.
भंडारा-गोंदिया जिल्ह्यासह संयुक्त असताना साकोलीमध्ये नवोदय विद्यालय होते. जिल्ह्याचे विभाजन करून गोंदिया जिल्ह्याची निर्मिती करण्यात आली, त्याचवेळी नवेगावबांध जिल्हा गोंदिया येथे नवोदय विद्यालय हलविण्यात आले. महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यांना स्वतंत्रपणे नवोदय विद्यालय आहेत. मात्र भंडारा जिल्ह्याच्या विभाजनापासून या जिल्ह्यात नवोदय विद्यालयाची स्थापनाच करण्यात आली नाही.
शासनाच्या निर्णयाप्रमाणे या शैक्षणिक सत्रापासून वर्ग ५ ते ८ मध्ये शिकत असलेल्या मुलांची नवोदय विद्यालयाच्या प्रवेशासाठीची स्पर्धा परीक्षा होणार आहे. परंतु फक्त गोंदिया जिल्ह्यातील नवोदय विद्यालयाच्या मंजुर तुकडी संख्याच्या आधारे भंडारा व गोंदिया स्पर्धा परीक्षा देणार्‍या मुलांचा निकाल लावला जातो. त्यामुळे बरीच गुणवंत विद्यार्थी नवोदय विद्यालयात प्रवेश मिळाल्यापासून वंचित राहतात. त्यामुळे इतर शाळा व महाविद्यालयमध्ये मुलांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. भंडारा जिल्ह्यातील साकोली, लाखनी व लाखांदूर तालुक्यात आदिवासी बहुल व नक्षलग्रस्त तीन तालुके आहेत. नवीन निर्मित पालघर जिल्ह्यासह आदिवासी बहुल नंदुरबार व धुळे जिल्ह्यातही शासनाच्या वतीने नवोदय विद्यालयाची निर्मिती केली आहे. भंडारा जिल्ह्यातील शैक्षणिक गुणवंत असलेल्या मुलांच्या पुढील प्रगतीसाठी भंडारा जिल्ह्यातही नवोदय विद्यालयाची स्थापना होणे आवश्यक आहे. शिष्टमंडळामध्ये एन.एम. घोडीचोर, कैलास गेडाम, फिरोज खान, शब्बीर पठान, विजय रामटेके, किशोर नंदुरकर, जयश्‍वर मेश्राम, प्रल्हाद रामटेके उपस्थित होते.