भंडारा,दि.१७ :-वरठी येथील सनफ्लग कंपनीतील एसएमएस विभागात 70 फूट उंचावरून खाली पडून क्रेन ऑपरेटर पदावर कार्यरत असलेल्या मारुती महादेव भिवगडे (वय 45,रा.पाचगाव,ता.मोहाडी)यांचा मृत्यू झाल्याची घटना आज १७ जानेवारी रोजी सकाळी १० वाजेच्या सुमारास घडली.घटनेनंतर घराचा प्रमुख कमावता गेल्याने संतप्त ग्रामस्थांनी मृतदेह सनफ्लॅग गेट समोर तब्बल चार तास ठेऊन नुकसान भरपाईची मागणी केली.मृतकाच्या कुटुंबियास एक कोटीची मदत व दोन सदस्यास नौकरी अशी मागणी आंदोलकानी केले.शेवटी चर्चे दरम्यान सनफ्लॅग व्यवस्थापक मंडळाने काही मागण्या मान्य केल्याने सायंकाळी 5 वाजेदरम्यान मृतदेह अंत्यविधीसाठी उचलण्यात आले.

नेहमीप्रमाणे क्रेनऑपरेटर मारोती भिवगडे सकाळी 10 वाजेदरम्यान क्रेन ऑपरेट करण्यासाठी पायऱ्या चढण्यास सुरुवात केली. तोच पायऱ्यावरुन खाली कोसळल्याने जागीच मृत्यू झाला.यानंतर मारोती यास भंडारा येथील लक्ष हॉस्पिटल येथे नेण्यात आले .मात्र डॉक्टरानी त्यास मृत घोषित केले.मारोती हा घरचा एकमेव कमावता होता. पाचगावात जवळपास एक एकर शेतीचे असलेले मृतक मारोती भिवगडे यांची पत्नी अर्चना ही गृहिणी आहे. मुलगी सिमरन (18) व मुलगा सुमित (16) हा अकराव्या वर्गात शिकत आहे .मात्र सनफ्लॅग व्यवस्थापक मंडळाने कामगाराच्या सुरक्षेबाबत कुठल्याच उपयोजना केल्या नसल्याने मारोती भिवगडे याचा नाहक जीव गेला .यामुळे दुपारी 1 वाजेदरम्यान पाचगाव व वरठी परिसरातील संतप्त ग्रामस्थांनी सनफ्लॅग गेट समोर मृतदेह ठेऊन नुकसान भरपाईची मागणी केली.आंदोलनात पाचगाव सरपंच संतूलाल गजभिये व उपसरपंचासहीत ग्रामस्थांनी सहभाग घेत मागणी रेटून धरली .

माहिती मिळताच तुमसर विधानसभा क्षेत्राचे आमदार राजू कारेमोरे, माजी आमदार चरण वाघमारे हे आंदोलनस्थळी दाखल झाल्याने आंदोलन आणखी प्रखर झाले. आंदोलनकर्त्यांनी सनफ्लॅग कारखान्याविरोधात जोरदार घोषणाबाजी दिली.आंदोलन चिडघळत असल्याचे पाहून पोलीस उपनिरीक्षक अभिजित पाटील यांनी सनफ्लॅग व्यवस्थापक मंडळ व आंदोलनकर्त्यात चर्चा घडवून आणली.यात आंदोलनकर्ते व सनफ्लॅग व्यवस्थापक मंडळात चर्चा झाली.आंदोलनकर्त्यांच्यावतीने तुमसर विधानसभा क्षेत्राचे आमदार राजू कारेमोरे, माजी आमदार चरण वाघमारे, जिल्हा परिषदचे सभापती आनंद मलेवार ,माजी जि. प. सदस्य रामराव कारेमोरे, माजी पंचायत समिती सभापती रितेश वासनिक ,पाचगाव सरपंच संतूलाल गजभिये, उपसरपंच महेश कळंबे, ग्रामपंचायत सदस्य संघा उके, सामाजिक कार्यकर्ते अरविंद येळणे ,नितीन रामभाऊ भिवगडे , संतोष पटले यांनी विविध नुकसान भरपाईची मागणी केली, मात्र सनफ्लॅग व्यवस्थापक मंडळाचे रामचंद्र दळवी व पटले यांनी काही मागण्या मान्य केल्या.यात
मृत पावलेला कामगार मारोती भिवगडे यांच्या कुटुंबातील एका नौकरी देण्याचे आश्वासन दिले.शिवाय सर्व मार्गातून मृतकाच्या कुटुंबियांना जवळपास 30 लक्ष मिळणार एवढी रक्कम मिळेल. मृतकाच्या मुलाला आयटीआय किंवा पोलिटेक्निक करण्यासाठी सनफ्लॅग मदत करेल . सानुग्रह निधी म्हणून तात्काळ 2 लक्ष रुपयाची मदत देण्याचे लिखित आश्वासन सनफ्लॅग व्यवस्थापन मंडळाचे रामचंद्र दळवी यांनी दिले,त्यानंतर मृतदेह उचलण्यात आला.यावेळी साकोली एसडीपीओ शिवम विसापुरे, पोलीस उपनिरीक्षक अभिजित पाटील, वरठीचे ठाणेदार निलेश गिरी, मोहाडीचे ठाणेदार सुरेंद्र बेलखेडे, जवाहरनगरचे ठाणेदार भिमाजी पाटील, कारधाचे ठाणेदार गोकुल सूर्यवंशी, भंडारा ठाणेदार उल्हास भुसारी, तुमसरचे ठाणेदार संजय गायकवाड ,लाखनीचे ठाणेदार विलास बारसे व मोठया संख्येने पोलीस कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती.





