आरोग्य उपसंचालकांची ग्रामीण रूग्णालय देवरीला भेट

0
25

देवरी,दि.29- महाराष्ट राज्याच्या सिमेवर असलेल्या अतिसंवेदनशिल नक्षलग्रस्त राष्टीय महामार्गाच्या कडेला असलेले देवरी येथे ग्रामीण रूग्णालय आहे. परंतू, रूग्णालयाच्या इमारतीला ३४ वर्ष पुर्ण झाल्याने इमारत जीर्ण होत आहे व त्यामूळे छताचे पापूद्रे खाली पडत असल्याने केव्हाही जिवीतहाणी होउ शकते. तसेच येथे ट्रामा सेंटर असून देखील त्याची सुध्दा इमारत जीर्ण होत आहे. याची दखल घेत आ. संजय पुराम यांनी त्वरीत ग्रामीण रूग्णालय देवरीला भेट देउन इमारतीची पाहणी केली व जनतेची ही अडचण राज्याचे आरोग्यमंत्री ना. दिपक सावंत यांच्या समोर मांडली. मंत्री महोदयांनी संबंधित अधिका-यांना निर्देश देण्याचे आश्वासन दिले होते.पंरतु प्रशासनाला तसे निर्देश आले नाही. जनतेचा या आरोग्य संबंधिच्या अडचणीला घेउन आ. पुराम पुन्हा २६ सप्टेंबर रोजी आरोग्य मंत्री यांच्या दालनात जाऊन भेटले व चर्चा करून स्मरणपत्र दिले. मंत्री महोदयांनी तात्काळ संबंधित विभागाच्या अधिका-यांशी भ्रमणध्वनीवर चर्चा करून रुग्णालयाला भेट देण्याचे निर्देश दिले.त्यानुसार नागपूर विभागाचे विभागीय आरोग्य उपसंचालक डॉ. संजय जायस्वाल यांनी भेट देऊन पाहणी केली.त्यांच्यसोबत  जिल्हा शल्यचिकिस्तक डॉ. देवेंद्र पातूरकर, एन.एच.एम चे कार्यकारी अभियंता लोंठे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपविभागीय अभियंता वासनिक, भारतीय जनता पक्षाचे तालूका अध्यक्ष प्रमोद संगिडवार, प्रदेश कार्यकारणी सदस्य सविता पुराम, नगरसेवक यादोराव पंचमवार, कौशल्याबाई कुंभरे, भाजमुयो चे तालूका महामंत्री कुलदिप लांजेवार, वैद्यकिय अधिक्षक डॉ. दिपक धुमनखेडे उपस्थित होते. उपस्थित लोकप्रतिनिधी व अधिका-यांनी ग्रामीण रूग्णालयाचे निरीक्षण करून सकारात्मक उत्तर देत लवकरात लवकर नवीन इमारतीचा आराखडा व अंदाजपत्रकीय प्रस्ताव शासनाला पाठवू असे सांगितले. यावरून देवरी येथे लवकरच सर्व सोयी उपलब्ध रूग्णालय निर्माण होणार अशी चर्चा जनतेत सुरू झाली. यावेळी उपस्थित जनतेने आ. पुराम यांचे अभिनंदन केले.