अर्जुनी मोरगाव येथे विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थांची बैठक
अर्जुनी मोरगाव:अर्जुनी मोरगाव तालुक्यातील विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था व आदिवासी विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थांची महत्त्वपूर्ण बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत जिल्हा मध्यवर्ती बँकेने संस्थांच्या थकीत कर्जावरील व्याज तात्काळ बंद करावे, अन्यथा मोठ्या आंदोलनाला सामोरे जावे लागेल, असा इशारा संस्थांच्या पदाधिकाऱ्यांनी दिला.
बैठकीत सर्वानुमते ठराव मंजूर करून विविध मागण्या मांडण्यात आल्या. त्यानुसार जिल्हा मध्यवर्ती बँकेने 30 सप्टेंबर 2025 पासून जिल्ह्यातील सर्व विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था तसेच आदिवासी संस्थांच्या थकीत कर्जावर व्याज आकारणी त्वरित बंद करावी, अशी प्रमुख मागणी करण्यात आली. अन्यथा 30 सप्टेंबर 2025 नंतर व्याज आकारणी केल्यास संस्थांच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा देण्यात आला.
तसेच सन 2025-26 च्या चालू पीक कर्जाची मुददल रक्कम थेट संस्थांच्या कर्ज खात्यात मुददल म्हणून जमा करण्यात यावी व सभासदांकडून घेतलेली रक्कम व्याजामध्ये जमा करू नये, याबाबत बँकेने दक्षता घ्यावी अशी मागणी करण्यात आली.
बैठकीत आणखी एक महत्त्वाचा निर्णय घेताना, 30 सप्टेंबर 2025 पर्यंत थकीत कर्जावर संस्थांकडून आकारलेले नियमित व्याज कर्जमाफीची रक्कम आल्यानंतर संबंधित संस्थांना परत देणे बँकेस बंधनकारक राहील, असे ठरविण्यात आले. अन्यथा जिल्ह्यातील बँकेच्या सर्व शाखांसमोर विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थांचे संचालक मंडळ व सचिवांच्या वतीने आंदोलन करण्यात येईल, असा ठाम इशारा देण्यात आला.
याशिवाय शासनाकडून कर्जमाफी किंवा अन्य योजनांबाबत येणाऱ्या पत्रांची माहिती बँकेने तत्काळ संस्थांना द्यावी, जेणेकरून संस्थांना आवश्यक माहिती वेळेवर पाठविणे सोयीचे होईल. तसेच कर्जमाफीसंदर्भात बँकेच्या वतीने वेळोवेळी सूचना व प्रशिक्षण आयोजित करावे, अशी मागणीही या बैठकीत करण्यात आली. कर्जाची रक्कम व्याजामध्ये कपात करण्यात आल्यास संस्था संघटनेच्या वतीने आंदोलन करण्याचा इशाराही देण्यात आला.
या बैठकीत जिल्हा संघटनेचे अध्यक्ष डोमाजी बोपचे अध्यक्षस्थानी होते. संस्था संघटनेतर्फे बँक संचालक दुर्गाप्रसाद ठाकरे यांनी उपाध्यक्षपद भूषविले. तसेच सहकार महर्षी प्रा. सुभाष आकरे व यशवंत मानकर हे विशेष अतिथी म्हणून उपस्थित होते.
यावेळी जिल्हा कार्यकारिणी सदस्य शंकर पटले, डॉ. योगेश हरिणखेडे, ब्रिजलाल बिसेन आदी मान्यवर उपस्थित होते. तसेच तालुका संघटनेचे अध्यक्ष ललित बाळबुद्धे, उपाध्यक्ष सुभाष देशमुख, सचिव अरुण गजापुरे, मार्गदर्शक अण्णाजी पाटील डोंगरवार, विनायक मस्के, तानेसभाऊ ताराम, गजानन पुस्तोळे, सुभाष ब्राह्मणकर, ताराचंद बडोले, योगेश लाडे, विनोद डोंगरवार, शंकर लोगडे, दुलीचंद लांजेवार, कैलास कापगते, तानाजी कोरे, चिमणकर, तुलाराम मारगाये यांच्यासह तालुक्यातील सर्व संस्थांचे अध्यक्ष, सचिव व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सभेदरम्यान जिल्ह्यातील संघटनात्मक कार्यात सक्रिय असलेले मध्यवर्ती बँकेचे संचालक दुर्गाजी ठाकरे, प्रा. सुभाष आकरे, संघटनेचे अध्यक्ष डोमाजी बोपचे आणि यशवंत मानकर यांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
यावेळी ललित बाळबुद्धे, दुर्गाजी ठाकरे, प्रा. सुभाष आकरे, डोमाजी बोपचे आणि यशवंत मानकर यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करत संस्थांच्या हक्कांसाठी संघटितपणे लढा देण्याचे आवाहन केले. बैठकीत घेतलेले सर्व निर्णय लवकरच जिल्हा मध्यवर्ती बँकेसमोर अधिकृतरीत्या सादर करण्यात येणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.
त्याच प्रमाणे आगामी पदवीधर निवडणुकीत गोंदिया भंडारा आपल्या क्षेत्रातील वेक्तीना राजकीय पक्षानी संधी द्यावी अशी भावना यावेळी वेक्त करून, योग्यवेळी संघटना निर्णय घेईल अशी असे मत ठेवण्यात आले.





